डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील उर्सेकरवाडीत नोबेल रुग्णालया जवळील स्कायवॉकच्या जिन्याचा रस्ता मंचावर सामान ठेऊन पादचाऱ्यांना येजा करण्यासाठी फेरीवाल्याने रविवारी संध्याकाळी बंद केला. जिन्याचा रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी रविवारी रात्री दहा वाजता मुसळधार पावसात कारवाई केली. संबंधित फेरीवाल्याचे सामान जप्त करण्यात आले आणि मंच घणाच्या घावाने तोडून टाकण्यात आला.

गणेशोत्सवाचा सण आहे. रविवार आहे. त्यामुळे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आणि फेरीवाला हटाव पथक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात फिरणार नाहीत. त्यात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पालिका अधिकारी, फेरीवाला हटाव पथक रेल्वे स्थानक भागात कारवाई करण्यासाठी येणार नाही, असा विचार करून एका फेरीवाल्याने आपले सामान उर्सेकरवाडीतील मधुबन पूजा सिनेमागृहा समोरील नोबेल रुग्णालया जवळील जिन्याच्या उतार पायवाटेवरच प्रवाशांचा रस्ता अडवून मंचावर लावले होते. या जिन्यावरून चढ उतार करण्यासाठी प्रवाशांना एक व्यक्ति जाईल एवढाच रस्ता फेरीवाल्याने ठेवला होता.

गणेशोत्सव असल्याने नागरिक खरेदीसाठी, गणपती दर्शनासाठी अधिक संख्येने बाहेर पडतात. नोबेल रुग्णालयाजवळील पालिकेच्या स्कायवाॅकवरील जिन्यावरून नागरिक चढ उतर करत होते. त्यावेळी त्यांना जिन्याच्या प्रवेशद्वारावर फेरीवाल्याने मंच आडवा करून सामान लावून प्रवाशांची पायवाट बंद केली असल्याचे दिसले. काही नागरिकांनी फेरीवाल्याला मुसळधार पाऊस सुरू असला तरी प्रवाशांची वाट न अडवून जिन्याच्या प्रवेशव्दाराच्या बाजुला व्यवसाय करण्याची सूचना केली होती.

मुजोर फेरीवाला नागरिकांचे ऐकण्यास तयार नव्हता. जिन्यावरील वाढती गर्दी, मुसळधार पाऊस, त्यात जिन्याचे मुख्य प्रवेशव्दार अडवून ठेवण्यात आल्याने नागरिक त्रस्त होते. अखेर डोंबिवली पश्चिमेतील एक जागरूक नागरिक अरेकर यांनी जिन्याचे प्रवेशव्दार अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याच्या मोबाईल मधून प्रतिमा काढल्या. त्या प्रतिमा ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पवार यांना पाठविल्या. रविवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकासह साहाय्यक आयुक्त भारत पवार आपल्या प्रभागातील कृत्रिम, नैसर्गिक तलाव भागात गणपती संकलन, विसर्जनाच्या कामात व्यस्त होते.

रात्री गणपती विसर्जन पूर्ण झाल्यानंतर साहाय्यक आयुक्त पवार फेरीवाला हटाव पथकासह उर्सेकरवाडी भागात आले. त्यांनी जिना अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्याचे सामान जप्त केले. तसेच, त्याचा सामान लावण्याचा मंच तोडून टाकला. अचानक रात्री उशिरा झालेल्या या कारवाईने फेरीवाला हादरला. आणि इतर चोरून लपून व्यवसाय करणारे फेरीवाले ही कारवाई सुरू असताना परिसरातून पळून गेले.

अनंत चतुर्थीनंतर डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसणार नाही अशा पध्दतीने फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. जे फेरीवाले निर्ढावलेले आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग. डोंबिवली.