कल्याण : कल्याण शहर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहन कोंडीने गजबजलेले असते. शिळफाटा रस्त्यावरील कोंडीचा फटका डोंबिवलीला बसू लागला आहे. वाहन कोंडीने नागरिक बेजार झाले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी कल्याण, डोंबिवली शहराबाहेर गेलेला बाह्य वळण मार्ग जलदगतीने मार्गी लावा, अशा सूचना कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना केल्या.

कल्याण, डोंबिवली शहरांमधील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या विषयावर आयुक्त गोयल यांनी पालिकेत ‘एमएमआरडीए’, वाहतूक, पोलीस आणि पालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविली होती. या बैठकीत ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी मेट्रो, सीमेंट काँक्रीटकरण कामे करताना पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याचे तुणतुणे वाजविले. त्यामुळे काम करण्याची इच्छा असुनही एमएमआरडीएच्या ठेकेदाराला वेगाने कामे करता येत नाहीत, अशी तक्रार केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आयुक्तांनी एकमेकांंवर अशी जबाबदारी न ढकलता शहरातील सुरू असलेले विकास कामे वेळीच पूर्ण झाली पाहिजेत, अशी कणखर भूमिका घेतली.

त्यानंतर आयुक्तांनी टिटवाळा ते कल्याण, डोंबिवली, काटई, हेदुटणे दरम्यान जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्याच्या कामाच्या प्रगतीची माहिती घटनास्थळावर जाऊन घेतली. आयुक्तांनी गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता ते मोठागाव माणकोली उड्डाण पुला दरम्यानच्या बाह्य वळण रस्त्याची पाहणी केली. या कामात कोणते अडथळे आहेत याची माहिती घेऊन खासगी जमीन मालकांचे अडथळे असतील तर त्यांचीशी चर्चा करून भरपाईचा विषय बोलून वळण रस्त्याचा विषय मार्गी लावण्याची सूचना केली.

बाह्य वळण रस्त्याचे टिटवाळा ते काटई, हेदुटणे असे एकूण सात टप्पे आहेत. हे सातही टप्पे विहित वेळेत पूर्ण झाले पाहिजेत. यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना केल्या. या कामासाठी एमएमआरडीएला जमिनीचे अडथळे असतील तर त्या जागांचे भूसंपादन करून ती जमीन ठेकेदाराला विनाविलंब उपलब्ध करून देण्याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना केली.या दौऱ्याच्यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. वळण रस्त्यामधील ५० टक्क्याहून अधिकची जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली आहे, वळण रस्त्यांमधील रस्ते, सरकारी जमिनींचा विषय सुटला आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

माणकोली पूल ते कोपर, आयरे, भोपर, काटई ते हेदुटणे दरम्यानच्या वळण रस्त्याच्या जमिनीचे गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत स्थानिकांनी जमीन मोजणी, भूसंपादन करून दिले नाही. या वळण मार्गावर अनेक ठिकाणी राजकीय मंडळींचे बंगले, बेकायदा इमारती, चाळी आहेत. त्यामुळे या भूसंपादनाला रहिवासी पुढे करून राजकीय मंडळी विरोध करत आहेत. राजकीय मंडळींची बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी मोठागाव माणकोली ते काटई दरम्यानच्या बाह्य वळण रस्त्याची सीमा रेषा बदलण्यात आल्याची चर्चा आहे. यामध्ये एका विकासपुरूष राजकीय नेत्याने महत्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा आहे.