कल्याण – घरफोड्या, देवाच्या मंदिरांमध्ये चोऱ्या सुरू असताना चोरट्यांनी आता कल्याण, डोंबिवली शहरातील औषध दुकाने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास औषध विक्री दुकानाचे लोखंडी शटर, त्याचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम लुटून नेली जात आहे. डोंबिवली पूर्वेत गेल्या आठवड्यात छेडा औषध विक्रीच्या दुकानात चोरी झाली होती. रविवारी मध्यरात्री मोहने येथील महाराष्ट्र मेडिकल दुकानात चोरट्यांनी चोरी केली आहे. या चोरीप्रकरणी दोन्ही औषध विक्रेत्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या आहेत.

कल्याणमधील आंबिवली मोहने भागात राहणारे कुणाल वेलाराम पटेल यांचे मोहने परिसरात यादव नगर मोहने रस्त्यावर विराट क्लासिक इमारतीच्या गाळ्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल आणि जनरल स्टोअर्स आहे. दररोज सकाळी नऊ वाजता दुकान उघडून रात्री दहा वाजता दुकान बंद केले जाते. दुकानातील औषध विक्रीतून मिळालेले पैसे दुकानातील गल्ल्यातील तिजोरीत ठेवले जातात. दुकानातील तिजोरीत पटेल यांचे ५५ हजार रूपये होते. औषध दुकानांमध्ये कोण चोरी करील या विचारातून कुणाल पटेल यांनी घरी पैसे नेले नाहीत.

रविवार रात्री बारा ते सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान कुणाल पटेल यांच्या मोहने येथील औषध दुकानाच्या मुख्य प्रवेशव्दाराचा लोखंडी दरवाजा चोरट्यांनी धारदार कटावणीने (कैची) उघडला. प्रवेशव्दाराचे कुलूप तोडण्यात आले. दुकानात प्रवेश करून दुकानातील तिजोरीतील ५५ हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. सकाळी कुणाल पटेल आणि त्यांचे काम दुकानात आले. त्यावेळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे आढळले. या चोरीप्रकरणी कुणाल पटेल यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.

कल्याण मधील चोरीच्या दोन दिवस अगोदर चोरट्यांनी डोंबिवली पूर्वेतील सरोजा आर्केडमधील छेडा औषध विक्री दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली होती. या दुकानातून चोरट्यांनी ग्राहक विक्रीतून मिळालेली रोख रक्कम, दुकानातील चांदीचे शिक्के असा एकूण ३३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. वैभव छेडा आपल्या औषध विक्री दुकानात सकाळी नऊ वाजता येतात. रात्री दहा वाजता दुकान बंद करतात. गेल्या शुक्रवारी रात्री अकरा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यावर चोरट्यांनी मध्यरात्रीच्यी सुमारास छेडा औषध दुकानाचे मुख्य लोखंडी शटर तोडले. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे.

छेडा दुकानाशेजारील नेक्स्ट स्टेप दुकानाचे मालक दुकानात शनिवारी सकाळीनऊ वाजता आले. त्यांना छेडा दुकानाचे शटर तुटलेले आढळले. त्यांनी वैभव छेडा यांना माहिती दिली. त्यांनी दुकानात येऊन पाहिले तर दुकानातील गल्ल्यातील २२ हजार रूपयांची रोख रक्कम, ११ हजार रूपये किमतीचे सात चांदीचे शिक्के असा एकूण ३३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांंनी चोरून नेला. या चोरीप्रकरणी वैभव छेडा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

कल्याण, डोंबिवलीतील औषध विक्री दुकानांमध्ये चोऱ्या वाढू लागल्याने पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी औषध विक्रेता संघटनेने केली आहे. यासंदर्भात आम्ही लवकरच पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहोत, असे डोंबिवली औषध विक्रेता संघटनेचे नीलेश वाणी यांनी सांगितले.