कल्याण – गेल्या सहा महिन्यांपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात गर्भवती महिलेचा मृत्यू, रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू, वेळीच उपचार न मिळाल्याने साप चावून दोन महिलांचा मृत्यू अशा घटना घडत असताना, आता याच वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कल्याणमधील पत्रीपूलजवळील श्वान निर्बिजीकरण केंद्राचा ठेकेदाराचा ठेका संपला असताना, या ठेकेदार एजन्सीच्या खर्चाची तब्बल ३३ लाख ६४ हजार ५७८ रूपयांची देयक मंजुरीसाठी तयार केली आहेत.

या निर्बिजीकरण, लसीकरण केंद्रातील श्वानांचे डाॅक्टर नोकरी सोडून गेले असताना त्यांच्या नावे पालिकेत वेतन काढले जात आहे. दररोज पालिका हद्दीतील ४० भटके श्वान पकडून त्यांच्यावर पालिका निर्बिजीकरण केंद्रात नसबंदीची शस्त्रक्रिया पार पडतात, अशी बोगस कागदपत्रे तयार करून फक्त देयके काढण्याचे काम पत्रीपुलाजवळील, सर्वोदय माॅलसमोरील पालिका श्वान निर्बिजीकरण केंद्राचा प्रमुख कमलेश सोनावणे हे करत आहेत.

त्यांना आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू करावी. आणि सोनावणे यांच्या या बनावट कागदपत्र, देयके काढण्याच्या कामात सहभागी असलेल्या वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.

मागील काही वर्षापासून कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक प्राणीप्रेमी नागरिक पालिकेच्या पत्रीपुलाजवळील निर्बिजीकरण केंद्रातील गैरप्रकार, गैरव्यवहाराविषयी चर्चा करत असतात. आता ही सर्व माहिती माहिती अधिकारात आणि विश्वसनीय सुत्रांकडून उघड झाल्याने निर्बिजीकरण केंद्रातील पालिका कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आयुक्तांंना केलेल्या तक्रारीतील मुद्दे

मार्च २०२५ मध्ये पत्रीपुलाजवळील श्वान निर्बिजीकरण केंद्र चालविणाऱ्या पुणे येथील मे.जीवरक्षा ॲनिमल वेल्फेअर ठेकेदाराचा ठेका संपला आहे. त्यांना मौखिक मुदतवाढ देऊन एप्रिल ते जून या कालावधीतील त्यांच्या खर्चाची प्रती महिना १० लाख ते ११ लाख अशी एकूण ३३ लाख ६४ हजार रूपयांची देयके तयार करण्यात आली आहेत. केंद्रात दररोज किती श्वानांवर शस्त्रक्रिया होतात याचे फक्त १५ दिवसांचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. निर्बिजीकरण केंद्रात तीन डाॅक्टर कार्यरत असल्याचे कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात एका डाॅक्टरची उपस्थिती असते.

ऑगस्ट २०२४ च्या हजेरी पत्रकात डाॅ. राजेश सहानी यांची नोंद आहे. त्यांनी तीन वर्षापूर्वीच नोकरी सोडली आहे. तरीही त्यांचे वेतन काढले जाते. डाॅ. महेश आहेर हे एमके संस्थेतर्फे कंत्राटी पध्दतीने केंद्रात काम करतात. मे. जीवरक्षा ॲनिमल वेल्फेअर एजन्सीनेत्यांना आपल्या हजेरी पटावर दाखवून पालिकेची फसवणूक केली आहे.

श्वान वाहनांवर जीपीएस यंत्रणा नाही. श्वान पकडण्याची खोटी आकडेवारी दप्तरी नोंद आहे. केंद्रातील हजेरीपटावर १८ कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात नऊ कर्मचाऱ्यांची भविष्य निधीची रक्कम भरणा केली जाते.

अधिक माहितीसाठी निर्बिजीकरण केंद्र प्रमुख कमलेश सोनावणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांना सतत संंपर्क केला. त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही. एका वरिष्ठाने सांगितले, या तक्रारीतील प्रत्येक मुद्दा तपासून कोणी दोषी आढळल्यास योग्य कारवाई केली जाईल.