कल्याण – सात वर्षापूर्वी कल्याणमध्ये एका मोटार कार चालकाने दुचाकीवरून जात असलेल्या कल्याण मधील एका महिलेच्या दुचाकीला पाठीमागून जोराने धडक दिली होती. या अपघातात महिला वकील जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले होते. याप्रकरणात ठाणे येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य आर. व्ही. मोहिते यांनी दावेदार आणि प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून या अपघातात जखमी झालेल्या महिला वकिलाला एक लाख नऊ हजार ५१६ रूपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. दावा दाखल तारखेपासून नऊ टक्के व्याजाने प्रतिवादींनी ही रक्कम दावेदार वकिलाला द्यावी, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.
३९ वर्षीय या महिला वकिलाने मोटार अपघात प्रकरणी ठाणे येथील मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणाकडे मोटार अपघात कायद्याच्या कलम १६६ अन्वये दहा लाखाच्या भरपाईसाठी व्याजासह हक्क दावा दाखल केला होता. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून वकील महिलेला एक लाख नऊ हजार ५१६ रूपयांची भरपाई व्याजासह देण्याचे निर्देश प्रतिवादी मोटार कार मालक आणि या वाहनाच्या विमा कंपनीला दिले.
१० नोव्हेंबर २०१८ रोजी वकील महिला आपल्या दुचाकीवरून कल्याणमधून जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे मोटार कार चालविणाऱ्या चालविणाऱ्या चालकाने जोराने वकील महिलेच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या धडकेत वकील महिला दुचाकीवरून पडून जखमी झाल्या होत्या. दुचाकीचे नुकसान झाले होते. या अपघात प्रकरणी वकील महिलेच्या तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.
या अपघात प्रकरणी वकील महिलेने मोटार वाहन अपघात न्यायप्राधिकरणाकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. हा अपघात मोटार कार चालकाच्या निष्काजीपणामुळे झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. अपघात झाला त्यावेळी चालकाकडे वाहन चालक परवाना नव्हता. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करून न्यायालयात कार चालका विरूध्द आरोपपत्र दाखल केले होते.
कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असला तरी या प्रकरणातील दावेदाराला फार मोठी कायमस्वरूपी गंभीर दुखापत झाली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाने वकील महिलेचा दरमहा ७५ हजार रूपये उत्पन्नाचा दावा फेटाळला. या अपघातामुळे दावेदार वकील महिलेचे भविष्यकालीन खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. किंवा अपघातानंतर वकील महिलेलाच्या वकिली व्यवसायावर खूप परिणाम झाला, असा कोणताही सबळ पुरावा वकील महिला मोटार वाहन अपघात न्यायाधिकरणासमोर दाखल करू शकल्या नाहीत.
या सर्व बाजू विचारात घेऊन न्यायाधिकरणाने वकील महिलेला रुग्णालय खर्च, अपघात काळात वकिली न करता आल्याने झालेले आर्थिक नुकसान, याशिवाय मेहनताना आणि इतर औषध खर्चाचा विचार करून एकूण एक लाख नऊ हजार ५१६ रूपयांची भरपाई जाहीर केली.