डोंबिवली मागील १५ वर्षापूर्वीच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदे उपभोगून नेते पदापर्यंत पोहचण्यास पात्र डोंबिवली, कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिकांना शिवसेनेने उशिरा का होईना मानाची पदे देण्यास सुरुवात केल्याने शिवसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शिवसेनेतील फुटीनंतर डोंबिवली विभागाचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर कल्याण लोकसभेचा भाग असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांची निवड शिवसेनेकडून बुधवारी जाहीर करण्यात आली.

डोंबिवली शहर अध्यक्षपदी विवेक खामकर यांची निवड करण्यात आली. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. यापूर्वी शिवसेनेच्या महत्वाच्या पदांवर असलेले शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. या रिक्त पदांवर शिवसेना ठाकरे गटाकडून नव्याने नेमणुका करण्यास सुरुवात झाली आहे. खामकर हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. शिंदे यांच्या फुटीनंतर शिवसेना मध्यवर्ति शाखेतून शिंदे पिता-पुत्रांच्या तसबिरी काढून टाकण्यात खामकर यांचा महत्वाचा वाटा होता. याविषया वरून त्यांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहिले नव्हते.

‘लोकसत्ता’चे वृत्त खरे ठरले

शिंदे गटात दाखल झाल्यामुळे गोपाळ लांडगे यांनी कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा, राजेश मोरे यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला. या रिक्तपदी काही ज्येष्ठ शिवसैनिक आपली वर्णी लागेल म्हणून प्रतीक्षेत होते. गेल्या ४२ वर्षापासून शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांचा निष्ठावान कट्टर, शिवसैनिक म्हणून काम केलेल्या डोंबिवली शहर शाखेचे शहराध्यक्ष पद दोन वेळा भूषविलेल्या सदानंद थरवळ यांची अखेर कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते उपजिल्हाप्रमुख होते. ‘लोकसत्ता’ने गेल्या दहा दिवसापूर्वी कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख पदी सदानंद थरवळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त दिले होते.शिंदे यांच्या फुटीनंतर शिवसेनेत फूट पडली तरी थऱवळ यांनी स्थितप्रज्ञ राहून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच पाठीशी राहण्याचा निर्धार केला. थरवळ यांचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, त्यांच्या डोंबिवलीकर पत्नी रश्मी यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत. या सगळ्या नात्याचा थरवळ यांना फायदा झाल्याचे बोलले जाते.

भोईर, थरवळ जोडी

कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख पदी माजी आ. सुभाष भोईर यांची गेल्या महिन्यात ठाकरे गटाकडून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रातील कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण २७ गाव क्षेत्रात भोईर, थरवळ हे एकत्रित काम करतील. कल्याण लोकसभेचा हा भाग खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येतो. राज्यातील सत्ताधारी पक्षातील खासदाराच्या मतदारसंघात काम करताना भोईर, थरवळ यांना पक्ष उभारणीचे मोठे आव्हान असणार आहे. कल्याण ग्रामीणची शिवसेनेची जुनी फळी ठाकरे गटात आहे. कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे व शिवसैनिकांची मोठी साथ यावेळी त्यांना मिळेल.कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या वेळी डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागामध्ये शिंदे, ठाकरे गटाचा कस लागणार आहे.

उशिरा निवडी

चाळीस वर्षापासून शिवसेनेत निष्ठेने काम करणारे कल्याण, डोंबिवलीतील अनेक शिवसैनिक शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, नेते पदी पोहचणे आवश्यक होते. परंतु, सत्ता, मुंबई केंद्रीत शिवसेनेच्या राजकारणामुळे ज्या पध्दतीने डोंबिवली, कल्याणच्या शिवसैनिकांना न्याय मिळणे आवश्यक होते. तो मिळाला नाही, अशी खंत अनेक ज्येष्ठ शिवसैनिक व्यक्त करतात. डोंबिवलीतील दिवंगत ॲड. शशिकांत ठोसर, अजित नाडकर्णी, प्रभाकर चौधरी, सदानंद थरवळ, कल्याणमध्ये काका हरदास, बाळ हरदास, विजय साळवी, रवी कपोते, सचिन बासरे, तुषार राजे अशा अनेकांना शिवसेनेने जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, नेते ही मानाची पदे १५ वर्षापूर्वीच देणे आवश्यक होते. ही कृती कधी कोणी घडून दिली नाही. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक फुटीनंतर स्थितप्रज्ञ अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ज्या विश्वासाने ही महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. ती यशस्वीपणे पार पाडीन. या भागातील नागरी, सामाजिक प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. शिवसेनेचा या भागातील आहे तो प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याक्षणी विदा तज्ज्ञ नितीन मटंगे यांची खूप आठवण येते. – सदानंद थरवळ, जिल्हाप्रमुख कल्याण लोकसभा जिल्हा