कल्याण – कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्ता भागातील एका इडली विक्रेत्याच्या दुकानातून खरेदी केलेल्या इडली मेदु वड्यात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या ग्राहकाच्या तक्रारीवरून पालिकेने संबंधित इडली विक्रेत्याचे दुकानातील सर्व सामान जप्त केले आहे. तर पोलिसांनी इडलीच्या दुकानातील एकूण आठ जणांपैकी दोन जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ग्राहक गोरख शिंदे यांनी माध्यमांना दिली.

मागील काही दिवसांपासून कल्याण शहर रस्त्यावरील खड्डे, सततची वाहतूक कोंडी, त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी मटण मांस विक्रीवरील बंदीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या फतव्यावरून गाजत आहे. आता इडली मेदु वड्यात अळ्या सापडल्याचा विषय चर्चेत आला आहे. गोरख शिंदे कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्ता भागात कुटुंबीयांसह राहतात. या भागात एक इडली मेदु वडा विक्रीचे दुकान आहे. सकाळ, संध्याकाळ नागरिकांची या दुकानात नाष्टा करण्यासाठी गर्दी असते.

बुधवारी गोरख शिंदे यांचा मुलगा या इडली विक्री दुकानात नाष्टा खरेदीसाठी आला होता. त्याने दुकानातून इडली मेदु वडा, सांबार खरेदी केले. घरी जाऊन हे पदार्थ कुटुंबीयांनी खाण्यास घेतले. तेव्हा त्यांना त्यात अळ्या आढळून आल्या. सुरूवातीला त्यांना या पदार्थांमध्ये काही तिखट मिरी, जिरे असा काही पदार्थ टाकला आहे का असे वाटले. बारकाईने पाहिल्यावर इडली, मेदु वड्यात शिंदे कुटुंबीयांना अळया आढळून आल्या.

ही माहिती गोरख शिंदे यांनी तात्काळ इडली विक्रेत्याला कळवली. त्याला अळया असलेल्या मेदु वड्याची छायाचित्रे पाठवली. हे सर्व पदार्थ घेऊन गोरख शिंदे स्वता कर्णिक रस्त्यावरील त्या इडली विक्री दुकानात आले. तेव्हा त्यांनी तुम्ही ग्राहकाला अशाप्रकारचे लोकांच्या आरोग्याला बाधा होईल अशाप्रकारचे पदार्थ खाण्यास घालता का असे प्रश्न केले. दुकानदाराने गोरख शिंदेंकडून ताब्यात घेतलेले पदार्थ पाहून फेकून दिले. गोरख शिंदे यांनी पालिका अधिकारी आणि पोलिसांना ही माहिती दिली.

पालिकेचे कारवाई पथक तात्काळ इडली विक्रीच्या दुकानात आले. त्यांनी दुकानातील इडली मेदु वडा बनविण्याचे सर्व सामान जप्त केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. ग्राहकाची तक्रार नोंदून घेतली. गोरख शिंदेमुळे आपणास त्रास झाला म्हणून दुकानदाराने गोरख शिंदे आणि कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली आहे. या दुकानदाराची दादागिरी पाहून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी गोरख शिंदे यांनी केली आहे.

पालिकेची निष्क्रियता

मागील अनेक वर्ष जून ते सप्टेंबर या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आदेशावरून पालिका हद्दीतील वडापाव, पाणीपुरी, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या बंद असायच्या. पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या गाड्या बंद राहतील याची काळजी घ्यायचे. आता वैद्यकीय आरोग्य विभागाचा कारभार ढिसाळ झाला आहे. कोणाचेही नियंत्रण या विभागावर राहिले नाही. त्यामुळे पालिका हद्दीत राजरोस उघड्यावर पदार्थ, आणि बंदिस्त गाळ्यांमधील नाष्टा दुकानांमध्ये मनमानी पध्दतीने पदार्थ तयार केले जात आहेत.