कल्याण – स्वताच्या आर्थिक लाभ आणि स्वार्थासाठी गांजाची तस्कारी करून राज्याच्या विविध भागातील तरूणांना अंमली पदार्थांच्या धंद्यात ओढून, त्यांना व्यसनी करून त्यांचे आयुष्य, कुटुंब उध्वस्त करणाऱ्या १७ तस्करांना कल्याण मधील खडकपाडा ठाण्यांतर्गत दाखल गुन्हे प्रकरणात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशावरून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) लावण्यात आला.
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्का लावण्याची ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ही पहिली मोठी कारवाई आहे. या १७ गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख गुफरान हन्नान शेख हा टिटवाळा बनेली येथील रहिवासी आहे. याप्रकरणात पोलीस आणखी चार फरार तस्करांचा शोध घेत आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी कायद्याने दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आंध्रप्रदेश, विशाखापट्टणम, सोलापूर भागातून एकूण १३ जणांना दोन महिन्यापूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून ६२ किलो गांजा, शस्त्रे जप्त करण्यात आली होती. या १३ आरोपींची चौकशी करताना पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ११५ किलो गांजा, गांजा तस्करीसाठी महागडी वाहने, स्वसंरक्षणासाठी बेकायदा पिस्तुल असा एकूण ७० लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता.
ही टोळी आंध्रप्रदेश भागातील दुर्गम भागातून गांजा खरेदी करून आणत होती. हा गांजा साखळी पध्दतीने ही टोळी विशाखापट्टणमसह महाराष्ट्राच्या ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे, विक्री करत होती. या माध्यमातून ही टोळी कोट्यवधीचा रूपयांचा बेकायदा व्यवहार करत होती. तरूणाई या गांजाच्या आहारी जात होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीचे मूळ उखडून काढण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या टोळीला मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस आयुक्त डुंबरे यांना पाठविला होता. या टोळीतील पाच जणांवर विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे करत आहेत. मागील तीन वर्षापासून ही सतरा जणांची टोळी आंध्रप्रदेशातून गांजा आणून महाराष्ट्राच्या विविध भागात चोरट्या मार्गाने विकत होती.
मोक्कातील आरोपी
गुफरान हन्नान शेख (टिटवाळा), बाबा उस्मान शेख (आंबिवली), सुनील मोहन राठोड (बदलापूर), आझाद अब्दुल शेख (बदलापूर), रेश्मा अल्लाद्दीन शेख (अंबरनाथ), शुभम शरद भंडारी(फुरसुंगी, पुणे), असिफ शेख (मानखुर्द), सोनु हबीब शेख (मानखुर्द), प्रथमेश हरिदास नलावडे (माळशिरस, सोलापूर), अंबादास नवनाथ खामकर (सराटी, इंदापूर), आकाश बाळू भिताडे (चाकुरे, सोलापूर), योगेश दत्तात्रय जोध (जुळे सोलापूर) आणि इतर चार फरार आरोपी.
खडकपाडा पोलीस ठाण्यातील गांजाप्रकरणी दाखल गुन्ह्याचा सखोल तपास करताना ही सतरा जणांची टोळी उघडकीला आली. ही टोळी आर्थिक स्वार्थासाठी राज्याच्या विविध भागात गांजा विक्री करून तरूणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवत होती. या टोळीचा बिमोड करणे गरजेचे होते. वरिष्ठांच्या आदेशावरून याप्रकरणातील सतरा जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. – अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त. कल्याण.