कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी तीन वाजता कल्याण रेल्वे गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलीस, मुंबई यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून मुंब्रा, कर्नाटकातील दोन इसमांकडून २१ किलो वजनाचा चार लाख १७ हजार रूपये किमतीचा गांजा जप्त केला. या दोन्ही इसमांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
मेहताब आलम इरशाद आलम शेख (३५, रा. गॅलेक्सी सोसायटी, खान कम्पाऊंड, मुंब्रा, ठाणे), लाल अहमद मोहम्मद अमीन कोटकी (२७, रा. बंदेनवाज दर्गा, काळाघोडा, मतीन का घर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते ओरिसा राज्यातून पुरी एक्सप्रेसने बुधावारी दुपारी तीन वाजता कल्याण रेल्वे स्थानकात उतरले होते.
लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांची रेल्वे स्थानक परिसरातील अवैध धंदे, अंमली पदार्थ तस्करी, भुरट्या चोऱ्या रोखण्याविरुध्द मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांचे विशेष पथक फलाट क्रमांक पाचवर गस्त घालत होते. या दरम्यान पुरी एक्सप्रेस फलाट क्रमांक पाचवर आली. प्रवासी एक्सप्रेसमधून उतरून पिशव्या घेऊन रेल्वे स्थानकाबाहेर पडत होते. या प्रवाशांमध्ये दोन इसमांकडे अवजड पिशव्या होत्या. त्यांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यांच्याकडे अंमली पदार्थ असण्याचा संशय पोलिसांना आला.
पोलीस पथकाने त्यांना थांबविले आणि त्यांच्याजवळील पिशव्यांची तपासणीची मागणी केली. त्यावेळी दोन्ही प्रवासी गांगरले. त्यांनी तपासणीला नकार देऊन तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी मेहताब शेख, लाल कोटकी यांच्या जवळील पिशव्यांची तपासणी केली. या दोघांच्या पिशव्यांमध्ये एकूण २१ किलो गांजा आढळून आला. या गांजाची बाजारामधील किंमत चार लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांना समजले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली.
दोन्ही आरोपींनी हा गांजा आम्ही ओरिसा जिल्ह्यातील संबलपूर येथून आणला आहे, अशी कबुली पोलिसांना दिली. हे दोघे मुंबई, कल्याण परिसरात हा गांजा कोणाला विक्री करणार होते. त्यांनी यापूर्वी अशाप्रकारे परराज्यातून गांजाची किती वेळा रेल्वेमधून तस्करी केली आहे, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दोघांच्या अटकेमधून गांजा तस्करांची एक मोठी टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांना आहे.
ही कारवाई कल्याण गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुळे, उपनिरीक्षक सुधाकर सावंत, अंमलदार राम जाधव, अजय रौंधळ, स्मिता वसावे, जनार्दन पुलेकर, पद्मा केंजळे, प्रमोद दिघे, स्वप्निल नागरे, हितेश नाईक, रवींद्र ठाकुर, लक्ष्मण वळकुंडे, रुपेश निकम, सुनील मागाडे, रेल्वे सुरक्षा बळाचे गौरीशंकर एडले, विजय इंगळे, प्रधान आरक्षक निळकंठ गोरे, ओमप्रकाश रामभगत, हरीओम गुजर, विनय सिंग यांच्या पथकाने केली.