कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये बनावट नावे घुसवून मोठ्या प्रमाणात गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वीच घोळ घालण्यात आला आहे. या घोळाचा गैरफायदा घेऊन या मतदारसंघातून मागच्या दोन निवडणुकांमध्ये बबड्या आणि त्यानंतर बब्लू निवडून आला. हे घोळ घालण्याचे काम बबड्याने अर्थात ‘पुष्पा’ने केले आहे, अशी टीका मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे.

त्यामुळे ‘पुष्पा’ आला रे आला, असे म्हणत प्रत्येकाने मतदार यादीतील नावांवर बारकाईने लक्ष ठेऊन यापुढे मतदार याद्या कशा अद्ययावत असतील याकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे आवाहन मनसेचे नेते राजू पाटील यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश मतदार याद्या प्रमुखांची मेळाव्यात मनसेचे नेते राजू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये कसे घोळ घालण्यात आले आहेत याची माहिती कागदोपत्री सादर केली.

कल्याण ग्रामीणमध्ये दोन ते तीन वर्षापूर्वी जो मतदार आपला नाही अशा मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्या ठिकाणी कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पध्दतीने चार ते पाच बोगस नावे घुसविण्यात आली. अशा पध्दतीने कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या याद्यांमध्ये मतदारांचा फुगवटा करण्यात आला. दिवा ते काटई दरम्यानच्या मतदार याद्यांमध्ये हे नावांचे घोळ आपण बारकाई मतदार याद्या तपासल्या तेव्हा लक्षात आले. अशाप्रकारे आपणास घुसवलेले सातशे मतदार आढळून आले. अशी पाच नावे दुबार पध्दतीने याद्यांंमध्ये घुसविण्यात आली आहेत. त्यामुळे आपणास निवडून यायचे असेल, पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे हात बळकट करायचे असतील तर प्रत्येकाने मतदार याद्यांचा बारकाईने अभ्यास करून त्यामधील संशायस्पद, दुबार मतदारांची नावे वेगळी करून ठेवावीत. त्यांच्या खासगीत स्वतंत्र याद्या तयार कराव्यात, अशा सूचना राजू पाटील यांनी कार्यकर्त्याना केल्या.

आता मनसे नेते बाळ नांदगावकर सांगतात त्याप्रमाणे ‘गोंद्या आला रे आला म्हणून सावध राहा’ असे न म्हणता पुष्पा आले रे आला म्हणून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. ‘पुष्पाने’च हे काम केले आहे, अशी उपरोधिक टीका राजू पाटील यांनी काही राजकीय वजनदार मंडळींवर नाव न घेता केली.

लोकसभा निवडणुकीत मनसेने कल्याण ग्रामीणमध्ये मनसेने पाठिंबा दिला म्हणून बबड्या निवडून आला. लोकसभा निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये ८० ते ८५ हजाराची पोकळी, विधानसभा निवडणुकीत ६० ते ६५ हजाराची पोकळी (गॅप). या पोकळीत हा चार ते पाच गटाने घुसवलेले बोगस मतदार आहे. हा शोधण्यासाठी आतापासून कामाला लागा. आतापासून आपण ‘पुष्पा’सारखी दहशत ठेवली नाहीतर मतदान मतपत्रिका अन्यथा ईव्हीएम यंत्रावर घेतले तरी आपली ताकद असुनही या घोळामुळे आपल्यासमोर मोठे आव्हान आणि प्रत्येकाचे राजकीय भवितव्य कठीण असणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.