कल्याण – कल्याण शहरातील अनेक संस्थांचे अध्वर्यू आणि संस्थापक, विश्वस्त डाॅ. सुरेश एकलहरे यांचे शनिवारी त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डाॅ. एकलहरे यांचा संपूर्ण परिवार वैद्यकीय व्यवसायात आहे.

वैद्यकीय व्यवसाय सांभाळून डाॅ. सुरेश एकलहरे सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर होते. कल्याण शहरातील प्रत्येक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग सक्रिय असायचा. कल्याणमधील सामाजिक, ज्ञाती कार्याचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याज्ञवल्क्य संस्था, शुक्ल युजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, कल्याण संस्कृती मंच, सोशल सर्व्हिस लीग, सदिच्छा अपंग पुनर्वसन केंद्र, डाॅ. आनंदीबाई जोशी लोक विद्यालय, बालकल्याण संस्था अशा अनेक संस्थांच्या कार्यात त्यांचा नियमित सक्रिय सहभाग होता. यामधील अनेक संस्थांचे ते संस्थापक सदस्य, विश्वस्त होते.

वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर राहत असल्याने सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंंडळाचा शताब्दी मानाचा पुरस्कार डाॅ. सुरेश एकलहरे यांना मिळाला होता. अतिशय निगर्वी, शांत आणि संयमी म्हणून त्यांची ओळख होती. वैद्यकीय व्यवसाय करताना गरीब, गरजू रूग्णांची त्यांनी निशुल्क सेवा केली.

डोंबिवलीत चैत्र पाडव्याच्या शोभा यात्रेची सुरूवात माजी नगराध्यक्ष दिवंगत आबासाहेब पटवारी यांनी सुरूवात केली. त्यानंतर कल्याणमध्येही अशाप्रकारची शोभायात्रा निघणे आवश्यक आहे. आपल्या साहित्य, संस्कृतीचे ते प्रतिबिंब आहे, असे विचार व्यक्त करत कल्याण संस्कृती मंच स्थापनेत डाॅ. एकलहरे यांचा मोलाचा वाटा होता. शहरातील विविध जाती, धर्मातील लोकांच्या शांतता समितीत डाॅ. एकलहरे सहभागी होते.

कल्याण शहरातील जुन्या जाणत्यांनी सुरू केलेल्या सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक संस्था टिकल्या पाहिजेत. त्या नव तरूण पीढीने हातात घेऊन पुढे चालविल्या पाहिजेत यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न असत. यासाठी ते विश्वस्त असलेल्या संस्थांमध्ये नवतरूण पीढीला काम करण्यासाठी वाव मिळाला पाहिजे म्हणून आग्रही असत. त्यामुळेच कल्याणमधील अनेक संस्थांमध्ये जुन्या जाणत्यांबरोबर नव तरूण मंडळी सामाजिक संस्थांमध्ये काम करताना दिसत आहे.