कल्याण : पाऊस सुरू झाल्याने अधिकारी आपल्या बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी फिरकणार नाहीत, असा विचार करून टिटवाळ्यातील वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंंभार्णी टेकडी भागात भूमाफियांनी बेकायदा चाळी, नवीन चाळी उभारणीसाठी जोते बांधले होते. या बांधकामांच्या तक्रारी प्राप्त होताच, अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने ही सर्व बेकायदा बांधकामे तोडून टाकली.
बेकायदा चाळींचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री, उंभार्णी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दररोज बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, जोत्यांवर तोडकामाची कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुमारे अडीच ते तीन हजार बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या सततच्या कारवाईने भुमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांमुळे एका साहाय्यक आयुक्ताला सहा महिन्यापूर्वी निलंंबित व्हावे लागले.
प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी दररोज तोडकामाची मोहीम सुरू ठेऊन टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांची श्रृंखला पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या आठवड्यात टिटवाळा भागातील वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी भागात मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू आहेत. याच भागात नवीन चाळी उभारणीसाठी नवीन जोत्यांची उभारणी आणि त्यात मातीचे भराव केले जात आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना वरिष्ठांकडून मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी येथे नव्याने बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे पाऊस सुरू असताना जेसीबी आणि घणांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.
या बांधकामांची उभारणी कोणी केली आहे याची माहिती परिसरातून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण कोणीही रहिवासी याबाबतची माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. बांधकामांच्या ठिकाणचे मजूर, गवंडी कामाच्या ठिकाणाहून पळून गेले होते. कामाच्या ठिकाणचे सीमेंट, ग्रीट मातीत मिसळून या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.
पाऊस सुरू झाला असली तरी पावसाळ्यात कारवाई होणार नाही असा गैरसमज बेकायदा बांधकामधारकांनी करू नये. पावसाळ्यातही बेकायदा चाळी, जोते, व्यापारी गाळे तोडण्याची मोहीम सुरूच राहणार आहे.- प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग. टिटवाळा.