कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेकडून अग्निशमन विभागातील कामाचा अनुभव नसलेल्या एका खासगी एजन्सीला कामाचा ठेका देण्याच्या हालचाली पालिकेत अग्निशमन विभागाकडून सुरू होत्या. यासंदर्भात प्रतिस्पर्धी ठेकेदार कंपनीकडून कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांकडे तक्रारी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ही विनाअनुभवी ठेकेदाराची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भातची अधिकृत कागदपत्रे ‘लोकसत्ता’कडे आहेत. ही निविदा रद्द झाल्याचे लघुसंदेश सर्वसंबंधितांना प्रशासनाकडून पाठविण्यात आले आहेत. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघड केले. लोकांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागातील अग्निशामक (फायरमन) आणि चालक कम तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांची भरती पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु, हे काम हमाल, सुरक्षा रक्षक आणि डेटा ऑपरेटर पुरविण्यात येणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून करण्याच्या हालचाली पालिकेकडून करण्यात आल्या होत्या.

इमारत, घराला किंवा अन्य कोठेही आग लागली तर त्या ठिकाणी अग्निशमन विभागात मुरब्बी कर्मचारी वर्ग असावा लागतो. त्यामुळे ही कर्मचारी भरती काटेकोर, स्पर्धात्मक, गुणवत्ता पध्दतीने होणे आवश्यक होते. अग्निशमन विभागासाठी करण्यात आलेल्या या ठेकेदार नियुक्तीच्या निविदा प्रक्रियेत अग्निशमन विभागातील कामाचा अनुभव नसलेल्या विनाअनुभवी ठेकेदाराला काम देण्यात आल्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती.

अग्निशमन विभागप्रमुखांनी विहित प्रक्रिया पार पाडून कामाचा योग्य अनुभव असलेल्या, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा देणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, अशी भूमिका घेतली होती. या निविदा प्रक्रियेत जळगाव येथील मे. रेऑन प्रोटेक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सहभाग घेतला होता. हे काम अन्य एका कामाचा अनुभव नसलेल्या खासगी एजन्सीला मिळाले आहे हे समजल्यावर मे. रेऑन प्रोटेक्शन्स कंपनीच्या संचालक डॉ. सरोज भालोदे यांनी आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र लिहून अग्निशमन विभागाची ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती.

या तक्रारीची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली. हे प्रकरण तपासून ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या एजन्सीकडे अग्निशामक पुरविण्याचा अनुभव नाही. महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक अग्निशामक या एजन्सीकडे नाहीत. अग्निशामक, चालक कम तंत्रज्ञांच्या शैक्षणिक गुणवत्तेची कागदपत्रे निविदेत जोडली नाहीत.

दुकाने अधिनियम प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी संशयास्पद आहे. कामगार परवाना मुदत फेब्रुवारी २०२३ मध्ये संपली आहे. हे प्रमाणपत्र एक महिन्यात देण्यासाठी मुद्रांक शुल्क पेपरावर हमीपत्र दिले नाही, असे आक्षेप घेत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मे. रेऑन प्रोटेक्शन कंपनीने केली होती. ही प्रक्रिया रद्द झाल्याने अग्निशमन क्षेत्रातील पात्र ठेकेदारांना यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

या निविदे प्रक्रियेसंदर्भात अंतिम निर्णय घ्यायचा आहे. हे प्रकरण वरिष्ठांसमोर अंतिम मंजूरीसाठी ठेवायचे आहे. – वंदना गुळवे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.