डोंबिवली – कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील जिन्याचा मार्ग बंद करून उभारण्यात आलेल्या तीन बेकायदा गाळ्यांना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. या गाळे मालकांना त्यांच्या जमीन मालकी, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली आहेत. ही कागदपत्रे येत्या सात दिवसाच्या कालावधीत गाळे मालकांनी सादर केली नाहीतर तिन्ही गाळे पालिकेकडून भुईसपाट केले जाणार आहेत.
कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात (आयरे परिसर) भूमाफियांनी गणपती सुट्टीच्या कालावधीत बेकायदा गाळे उभारल्या आहेत, अशा तक्रारी पालिकेच्या ग प्रभागाकडे आल्या होत्या. गणपतीची पालिकेला सुट्टी असल्याने त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेतला असल्याची चर्चा होती. या गाळ्यांना सुशोभित करून तेथे आर. के. एन्टरप्रायझेस हे घर, गाळ्यांची विक्री करणारे कार्यालय माफियांनी सुरू केले आहे. रेल्वे जिन्याच्या मार्गात, प्रवाशांच्या जाण्याच्या मार्गात बेकायदा गाळे उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा >>> ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी या बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी परिमंडळ उपायुक्त व्दासे यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून बेकायदा गाळे उभारलेल्या जागेची पाहणी केली. स्थानिकांनी हे गाळे जुने असल्याचे आणि कार्यालय सजावट आता केली असल्याचे सांगितले. या गाळ्यांचा कोणीही जमीन मालक, चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यांची नावे, पत्ते देण्यास स्थानिक रहिवासी असमर्थतता दर्शवत होते.
हेही वाचा >>> धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
अखेर साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी तिन्ही गाळे मालकांच्या गाळ्यांवर नोटिसा लावून येत्या सात दिवसात गाळ्यांची जमीन मालकी, बांधकामांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. गाळे मालकांनी या कालावधीत पालिकेला संपर्क केला नाहीतर त्यांचे गाळे भुईसपाट करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे पालिका, रेल्वेच्या जागा हडप करून भूमाफिया या गाळ्यांमध्ये कार्यालये सुरू करतात. तेथून चाळ, इमारती मधील बेकायदा घरे, गाळ्यांची विक्री करतात, अशा तक्रारी आहेत.
भूमाफियांनी आपले म्हणणे वेळेत सादर केले नाहीतर तातडीने हे बेकायदा गाळे पालिकेने जमीनदोस्त करावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.
कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेले गाळे जुने असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गाळे मालकांना जमीन मालकी, बांधकामाची परवानगी, कर पावती अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली आहे. ही कागदपत्रे गाळे मालकांनी सादर करण्यास असमर्थतता दर्शवली तर गाळे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे तातडीने जमीनदोस्त केले जातील. संजयकुमार कुमावत , साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.