ठाणे : आनंद दिघे साहेबांचा मृत्यूचा मुद्दा दर निवडणूकीला घेतला जातो. त्या मुद्द्यावर चर्चा होते. या चर्चांनंतर सहानभुतीच्या मुद्द्यावर निवडणूका जिंकल्या जातात. त्यानंतर दिघे साहेबांच्या मृत्यूचा विषय बाजूला टाकला जातो. तुम्ही केवळ स्वार्थासाठी राजकारण करता असा आरोप आनंद दिघे यांचे पुतणे तसेच ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावर केला.
माजी खासदार राजन विचारे यांच्या चरई येथील कार्यालयात ठाकरे गटाच्या वतीने बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केदार दिघे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केदार दिघे यांनी शिंदे गटावर आरोप केला. तुमच्याकडे एवढीच ताकद आहे, अनुभव आहे, संपत्ती आहे तर तुम्ही ठाणेकरांचे प्रश्न का सोडवू शकला नाहीत. असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला.
केवळ निवडणुका आल्या की यांना शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण होते. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर आनंद दिघे यांच्या नावाने प्रवेशद्वार होते. हे प्रवेशद्वार आता कुठे गायब झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने करण्यात येणाऱ्या स्मारकाचाही यांना विसर पडला आहे असेही ते म्हणाले. ठेकेदार काळ्या यादीत आहेत. त्यांना कामे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
घोडबंदर भागात पाण्याचा प्रश्न आहे. त्याबाबत कोणतेही उत्तर मिळत नाही असेही दिघे म्हणाले. विरोधकांनी कितीही फोडाफोडी केली तरी मूळचा शिवसैनिक कुठेही हलेला नाही. तो शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने सोबत आहे असा दावा त्यांनी केला. जे गेले त्यांच्यावर नोकरी आणि व्यवसायाच्या कारणास्तव दबाव होता. या दबावा पोटी या लोकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप त्यांनी केला.