ठाणेः राज्यात एकीकडे शहरी भागात महापालिका, नगरपालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी पक्षांमध्येच संघर्ष पाहायला मिळत असताना एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागातही वातावरण तापू लागले आहे. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या मुरबाड या बालेकिल्ल्यात सोमवारी शिवसेनेचे खासदार आणि नेते डॉ श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका वर्षानुवर्षे राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला गेला. मुरबाडवर वर्चस्व असल्यास मुरबाड विधानसभा, मुरबाड नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे गण,गट तसेच शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यावरही काही अंशी वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी असते. त्यामुळे येथील राजकीय व्यक्तिंची यादीही तशी मोठी आहे. सध्या आमदार किसन कथोरे यांचा हा विधानसभा मतदारसंघ असून त्यामुळे या भागात भाजपचे वर्चस्व वाढले आहे.

सध्या पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही राजकीय वातावरण तापू लागले आहे. सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा मुरबाडमध्ये पार पडला. यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या काही महिन्यात बदलापुरात आमदार किसन कथोरे शिवसेनेला आव्हान देण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्याच मुरबाडमध्ये शिवसेनेचा हा मेळावा संपन्न होणे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. या मेळाव्यामुळे शिवसेनेत उत्साह पाहायला मिळाला असून हे शक्तीप्रदर्शन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तोंडावर महत्वाचे असल्याचे बोलले जाते.

गेल्या अडीच वर्षांत मुरबाड तालुक्यात १०० कोटींपेक्षा जास्त निधी विकासकामांसाठी मिळवण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीमार्फत आणखी ४० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली आहे, असे मत यावेळी श्रीकांत शिंदे यांनी मांडले. आगामी काळातही जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले

त्यामुळे आता सर्वांनी तयारीला लागा. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. या मेळाव्यात आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, सचिव भाऊसाहेब चौधरी, सहसचिव एकनाथ शेलार, उपनेते रूपेश म्हात्रे, उपनेते निलेश सांबरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, मदनबुबा नाईक, कांतीलाल कंठे, संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.