बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी आणि युती होणार किंवा नाही याविषयी येथील राजकीय वर्तुळात एकीकडे संभ्रमाचे वातावरण असताना सहा महिन्यांपूर्वी शहरात स्थापन झालेल्या कुळगाव-बदलापूर विकास आघाडीमार्फत ही निवडणूक लढविण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. बदलापूर शहरातील अपुरी विकासकामे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाविषयी आवाज उठविण्याच्या उद्देशाने ही आघाडी स्थापन करण्यात आली होती. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्र. २५ व प्रभाग क्र. २७ मधून आघाडीकडून दोन उमेदवार उभे करणार आहोत, अशी माहिती आघाडीचे निमंत्रक प्रभाकर पराष्टेकर यांनी दिली.
बदलापुरात भुयारी गटार योजना, अर्धवट अवस्थेत असलेले बीएसयूपी इमारतींचे प्रकल्प, प्रशासकीय इमारत घोटाळा, खड्डेमय रस्ते तसेच शहराच्या विकासाबाबत दूरदर्शी विचार न करता घेतलेले निर्णय या सगळ्याचा निषेध करत या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. बदलापूरचा विकास हा एकच ध्यास या घोषवाक्यांचा उच्चार करत आघाडीने शहरात काही दिवसांपूर्वी दुचाकींवरून मोठी प्रचार फेरीदेखील काढली होती. तसेच शहरात सर्व ठिकाणी पत्रके वाटून आघाडीला साथ देण्याचे आचारसंहितेपूर्वीच आवाहनदेखील करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र उमेदवार उभे न करता सध्या दोनच प्रभागात लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बदलापूर पूर्वेकडेच हे दोन्ही उमेदवार उभे राहणार असून प्रभाग क्र. २७ मधील वाणीआळी परिसरात स्वत: प्रभाकर पराष्टेकर हे आघाडीतर्फे उमेदवार असून गांवदेवी परिसराच्या प्रभाग क्र. २५ मध्ये इंद्रायणी देण्णी या आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. बदलापूरचा गेल्या वीस वर्षांत युतीच्या सरकारकडून विकास होऊ शकला नाही ही दुर्दैवाची बाब आहे. परंतु त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे ही आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.