शहापूर : शासनाच्या प्रधानमंत्री व जनमन आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते महिन्याभरापासून शासनाकडे थकल्याने शहापूर तालुक्यातील तब्बल ८ हजार ६५८ घरकुले अपूर्णावस्थेत आहेत. शासन दरबारी हेलपाटे मारूनही घरकुलांचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे उसनवारी करून घेतलेले बांधकामाचे सिमेंट, विटा, रेती या साहित्याची रक्कम फेडायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
त्यातच घरकुलाच्या उघड्या छताखाली पोटाची भूक भागवण्या बरोबरच उसनवारी फेडण्यासाठी रोजगाराच्या शोधात त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. लाभार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या या अडचणीमुळे घरकुल कधी पूर्ण होणार असा प्रश्न निर्माण झाला असून रखडलेले हप्ते तात्काळ देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री व जनमन आवास योजनेंतर्गत ९ हजार ७२८ घरकुले एक वर्षांपूर्वी मंजूर झाली आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी चार हप्त्यांमध्ये एक लाख वीस हजार तर जनमन आवास योजनेतील घरकुलांसाठी दोन लाख रुपये तीन हप्त्यांमध्ये आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतर कामाच्या स्थितीनुसार लाभार्थ्यांना देण्यात येतात.
पहिला हप्ता आठ हजार ९८४ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्यानंतर घराच्या जोत्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता, भिंती उभ्या केल्यानंतर तिसरा आणि छताचे काम पूर्ण झाल्यावर चौथा हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या प्रधानमंत्री व जनमन आवास योजनेतील आठ हजार ९८४ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने दुसरा, तिसरा व चौथा हप्ता रखडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची घरकुलांची कामे रखडली आहेत. शासनाकडून हप्ता मिळेल या अपेक्षेने लाभार्थ्यांनी सिमेंट, विटा, रेती, पत्रे इतर साहित्याची उसनवारी करून घरकुलांची कामे केली आहेत. मात्र १० ऑक्टोबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यात आवश्यक प्रक्रिया पार पडल्यानंतरही हप्ते मिळत नसल्याने लाभार्थी मेटाकुटीस आला आहे.
जनमन आवास योजनेतील कातकरी समाजाच्या लाभार्थ्यांनी उघड्या छताखाली हप्त्यांची वाट बघितली मात्र निराश झालेल्या लाभार्थ्यांना मोलमजुरी करून पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांच्याकडे स्थलांतर करण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पावसाळ्यात भिजत व थंडीत कुडकुडत दिवस काढणाऱ्या लाभार्थ्यांकडून घरकुलांच्या थकलेल्या हप्त्यांची मागणी केली जात आहे.
हा प्रश्न फक्त ठाणे जिल्ह्याचा नसून संपूर्ण राज्याचा असल्याचे सांगून शासनाच्या प्रणालीमध्ये बदल झाला असल्याने हप्त्यांसाठी विलंब झाल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विस्तार अधिकारी संतोष पांडे यांनी सांगितले.
