ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा येथील एका गृहसंकुलाच्या आवारात मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली. या बिबट्याच्या हल्ल्यात एक श्वान जखमी झाल्याचे कळते. घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर पथकाने गृहसंकुलातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच गुरुवारी गृहसंकुलाच्या आवारात जनजागृती केली जाणार आहे.
मानपाडा येथील खेवरा चौक परिसरात गृहसंकुल आहे. मंगळवारी मध्यरात्री या संकुलाच्या आवारात अचानक बिबट्या शिरला. त्याने गृहसंकुलाच्या आवारात झोपलेल्या दोन श्वानांपैकी एकावर हल्ला केला. या घटनेत श्वान जखमी झाल्याचे कळते आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर बिबट्या शिरल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर विन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संकुलात जाऊन पाहणी केली. हा बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आला असावा आणि पुन्हा जंगलात गेला असावा असा अंदाज वन विभागाचा आहे.
पथकाने येथील सुरक्षा रक्षकांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच सुरक्षा रक्षकांना गृहसंकुलाच्या आवारात एकत्र फिरण्याचे तसेच प्रकाशझोताचा वापर करण्याच्या सूचना केल्या. गुरुवारी गृहसंकुलातील नागरिकांसाठी बिबट्या दिसल्यास काय करावे, काय करु नये याबाबत जागृती केली जाणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.