ठाणे – ठाणे जिल्ह्यात गुरुवार पासून ढगाळ वातावरण झाले होते. परंतू, गुरुवारी पावसाने हजेरी लावली नाही. गुरुवार पाठोपाठ शुक्रवारी देखील ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. सकाळी १० नंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. जिल्ह्यात दिवसभर रिमझीम पाऊस पडत होता. या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले.
ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने शुक्रवारसाठी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार, शुक्रवारी जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस पडत होता. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही शुक्रवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. परंतू, या पावसामुळे बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांची तसेच कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून आली. अनेकांजवळ छत्री किंवा रेनकोट नव्हते, त्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी अडोसा शोधावा लागत होता.
ठाणे शहरात शुक्रवारी सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० या दरम्यान एकूण ८.३८ मिमी पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. यामध्ये दुपारी ३.३० ते ४.३० या एक तासाच्या कालावधीतच ४.३१ मिमी पाऊस झाला.ठाणे शहरात सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरूच होत्या. दिवसभर रिमझीम सुरु असलेल्या या पावसाचा शहरातील वाहतुकीवर विशेष परिणाम झाला नाही.
कल्याण डोंबिवली शहरातही सकाळपासून पावसाची रीपरिप सुरू होती.या पावसामुळे रस्तोरस्ती चिखल झाला होता. दुपारनंतर पावसाचा काहीसा जोर वाढला होता त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची तुरळक गर्दी होती. तर, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर येथे शुक्रवारी दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते. अंबरनाथ मध्ये सकाळी काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. यामुळे कामावर निघालेल्या नागरिकांची काहीशी धांदल उडाली. तर दुपारनंतर मात्र बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. तिन्ही शहरांमधे दुपारच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
