ठाणे : शहापूर येथे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकाकडून शस्त्रसाठा जप्त केला. दिलावर शेख (४५) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतुस जप्त केले.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस. स्वामी तसेच अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी ठाणे ग्रामीण क्षेत्रातील फरार आरोपी, अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.
दरम्यान, मंगळवारी शहापूर येथील चेरपोली गाव परिसरात मोहम्मद शेख हा अवैधरित्या शस्त्रास्त्र घेऊन आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि एक काडतुस आढळून आले. त्याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.