लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुढच्या शुक्रवारपर्यंत बैठक झाली नाहीतर, शनिवारपासून भंडार्ली येथे कचरा टाकू देणार नाही, असा इशारा मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह स्थानिकांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना शनिवारच्या बैठकीत दिला. या इशाऱ्याद्वारे त्यांनी एकप्रकारे पालिकेला आठ दिवसांची मुदत दिल्याचे चित्र आहे.
दिवा येथील कचराभूमी बंद करून महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह स्थानिकांनी शुक्रवारी बंद पडला. या प्रकल्पात कचरा टाकण्यास त्यांनी विरोध केल्याने ठाणे शहराची पुन्हा कचराकोंडी झाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह स्थानिकांसोबत तातडीची बैठक घेतली.
हेही वाचा.. भाईंदर मध्ये विषबाधेमुळे माय-लेकाचा मृत्यू
भंडार्ली प्रकल्प वर्षभराच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आला होता. परंतु वर्ष उलटूनही हा प्रकल्प अद्याप सुरूच आहे. या प्रकल्पात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच शेततळे आणि कुपनलिकांमधील पाणी दुषित झाले आहे. या प्रकल्पांच्या बदल्यात १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचीही सरकारने अद्याप पूर्तता केलेली नाही, अशा समस्यांचा पाढा आमदार पाटील यांच्यासह स्थानिकांनी आयुक्तांपुढे वाचला.
हेही वाचा… बदलापूर: माळशेजसह जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
तसेच भंडार्ली प्रकल्पात यापुढे कचरा टाकू देणार नाही, अशी आक्रमक भुमिका त्यांनी मांडली. त्यावर हा प्रकल्प बंद करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांच्याकडे केली. डायघर प्रकल्प सुरू करून भंडार्ली प्रकल्प १५ सप्टेंबरच्या आत बंद केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु आधीच्या आश्वासनांची पुर्तता झालेली नसल्यामुळे पाटील यांच्यासह स्थानिकांनी त्यास नकार दिला.
हेही वाचा… ठाणे: घोडबंदर मार्गावर भीषण अपघात, कंटेनर चालकाचा मृत्यू
आधी मुख्यमंत्र्याची भेट घडवून आणा अन्यथा, कचरा टाकू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यावर येत्या शुक्रवारच्या आत मुख्यमंत्र्यासमेवत भेट घडवून दिली जाईल आणि तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले. या प्रकल्पाचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. येथील रस्त्याची, दुर्गंधीची समस्या तत्काळ सोडविली जाईल. तसेच नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश करण्याबाबत संबधितांशी चर्चा केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. या आश्वासनानंतर आमदार पाटील यांच्यासह स्थानिकांनी पालिकेला आठ दिवसांची मुदत देऊ केली आहे. या मुदतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली नाहीतर, पुढच्या शनिवारपासून भंडार्ली येथे कचरा टाकू दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.