डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा येथील इलेषन फिस्कल पिक्सी खासगी गुंतवणूक संस्थेने मध्यस्थांच्या मार्फत ग्राहकांना गुंतवणुकीवर दर आठवड्याला पाच ते १५ टक्के वाढीव व्याजाचे आमिष दाखविले. या माध्यमातून कल्याण, उल्हासनगर, मुंबई, विरार, अंबरनाथ परिसरातील सुमारे ३०० हून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे पाच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.जून २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. १५ गुंतवणूकदारांनी एकत्रित येऊन मानपाडा पोलीस ठाण्यात इलेषन फिस्कल पिक्की प्रा. ली. (कार्यालय- जी-००२-ॲड्रिना डाऊनटाऊन, खोणी पलावा, डोंबिवली) कंपनी विरुध्द तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुंतवणूकदार संस्थेचे संचालक शिबू तुलसीदार नायर, पत्नी श्रीविद्या, मध्यस्थ नीतेश मर्ढेकर, प्रवीण म्हस्के, विवेक गाढवे (सर्व. रा. लोढा पलावा) आणि त्यांचे इतर साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेले पंकज नगराळे (रा. जुने अंबरनाथ गाव) यांनी तक्रार केली आहे.पोलिसांनी सांगितले, तक्रारदार पंकज नगराळे यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रवीण म्हस्के या मध्यस्थाने नीतेश मर्ढेकर या मध्यस्थाची ओळख करुन दिली. त्यांनी इलेषन फिस्कल कंपनीत गुंतवणूक केली तर तुम्हाला दर आठवड्याला ५ ते १५ टक्के परतावा मिळेल. आमची कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तू विनीयम बाजारात काम करते. आम्ही ग्राहकांना ३० टक्के खात्रीलायक परतावा देतो. प्रवीण, नीतेश यांनी पंकज यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणुकीसाठी उद्युक्त केले. त्यांची भेट इलेषन कंपनीचे संचालक शिबू नायर यांच्याशी घडून आणली.

हेही वाचा : ठाणे: आशा वर्कर्सना मिळणार पाच हजारांचे सानुग्रह अनुदान

१५ टक्के व्याज

पंकज यांनी एक लाख ४८ हजार २०० रुपये इलेषन कंपनीत गुंतविले. ठरल्याप्रमाणे ४४ हजार ४६० परतावा आणि मूळ मुद्दल एक लाख ४८ हजार रुपये परत मिळाले. नंतर त्यांनी स्वत आणि पत्नीच्या नावे पाच लाख ४७ हजार रुपये गुंतविले. ठरलेला कालावधी उलटला तरी परतावा मिळत नाही म्हणून पंकज यांनी मध्यस्थ प्रवीण म्हस्के यांना संपर्क सुरू केला. पंकज पैशासाठी तगादा लावत असल्याने प्रवीणने पंकज यांच्या व्हाॅट्सपवर आत्महत्येची चिठ्ठी पाठविली. पंकजसह इतर ५० ग्राहकांनी संचालक शिबू यांच्याकडे तगादा लावला. त्यांनी तुमचे पैसे परत करतो असे आश्वासन दिले.

हेही वाचा : डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष

संचालक फरार

३ ऑक्टोबर रोजी सर्व ग्राहक पुन्हा पलावा येथील कंपनी कार्यालयात गेले. कार्यालय बंद होते. शिबू यांनी ग्राहकांना आत्महत्या करण्याची चिठ्ठी पाठवून ‘मी तुम्हाला पैसे परत करू शकत नाही. हे नाटक सुशील गायकवाड याने घडवून आणले आहे. त्याने सगळ्यांची फसवणूक केली आहे.’ असे म्हटले होते. चिठ्ठी पाठविल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला.

हेही वाचा : ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन; दोन वर्षानंतर तरुणाईने लुटला सुरेल मैफिलीचा आनंद

संचालक, मध्यस्थांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर विक्रोळी, कल्याण, उल्हासनगर, खार, शहापूर, विरार, ठाणे भागातील ग्राहकांनी पंकज यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. सुमारे ३०० हून अधिक गुंतवणूकदारांनी तीन लाखापासून ते ३१ लाखापर्यंत इलेषन कंपनीत सुमारे ५ कोटी पेक्षा अधिक रकमेच्या गुंतवणुका केल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lodha palawa investment firm 5 crore fraud with investors shilfata dombivali tmb 01
First published on: 24-10-2022 at 13:35 IST