Premium

“टोलनाक्यावर दगडं मारून एकनाथ शिंदे…”, मनसे नेत्याची टीका; आंदोलन केल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात!

ठाण्यात टोलवाढ होणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी टोल प्राधिकरणाला अल्टिमेटम दिला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसह ठाण्यातील टोलनाक्यावर आंदोलनही केले.

MNS Protest
वाढीव टोलप्रश्नी मनसेचे ठाण्यात आंदोलन (फोटो – मनसे अधिकृत/ ट्विटर)

महाराष्ट्रातील टोलप्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून सातत्याने आवाज उठवला जातो. काही वर्षांपूर्वी मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला यश येत महाराष्ट्रातील अनेक टोलनाके बंद झाले होते. आता पुन्हा एकदा मनसेने वाढीव टोलप्रश्नी आवाज उठवला असून याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यात टोलवाढ होणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी टोल प्राधिकरणाला अल्टिमेटम दिला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसह ठाण्यातील टोलनाक्यावर आंदोलनही केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यात १ ऑक्टोबरपासून टोलवाढ होणार आहे. ५, १०, १५ रुपयांची टोलवाढ करण्यात आल्याची माहिती अविनाश जाधव यांनी केली. ही टोलवाढ रोखण्यासाठी त्यांनी ठाण्यातील टोलनाक्यावर आज मनसे कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं. तसंच, संबंधित अधिकाऱ्यांना टोलवाढ न करण्याबाबत निवेदनही दिले. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच टोलवाढ होत असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा >> मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तांत्रिक बाबी…”

“२०१४ मध्ये जेव्हा यांचं (भाजपा) सरकार बसलं तेव्हा पहिल्यांदा एकनाथ शिंदे टोल नाक्यावर दगडं मारून अधिवेशाला गेले होते. याच जागेवर टोलमुक्त ठाण्याचे होर्डिंग्स लागले होते, आज मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी टोलमाफ तर केला नाहीच, पण असलेला टोल वाढवण्याचा घाट घातलेला आहे. तो घाट महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण होऊ देणार नाही”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

टोलमुक्त ठाणे गेलं चुलीत

“वाढीव टोल ठाणेकर भरणार नाहीत, हा टोल बंदच झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सत्तेत येण्यासाठी तुम्ही शब्द दिला होतात की आम्ही टोलमुक्त ठाणे करू. टोलमुक्त ठाणे गेलं चुलीत, पण सरकारकडून आर्थिक भुर्दंड वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने आम्हाला चर्चेला बोलवावं, आमची बाजू ऐकून घ्यावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोलवाढ खपवून घेणार नाही”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

टोल वाढवण्याचा अधिकार कसा?

“संपूर्ण ठाणेकरांना कळलं पाहिजे की आपला मुख्यमंत्री असताना देखील पाच, १०, १५ रुपयांनी टोलवाढ केली जात आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. खरंतर ठाण्याचा हा टोल बंदच झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०२२ नंतर हा टोल मुंबई पालिकेकडे हँण्डओव्हर व्हायला हवा होता, त्याचे पैसे एमएमआरडीए कसे घेऊ शकते आणि टोल वाढवण्याचा काय अधिकार आहे? याची उत्तरे सरकारने द्यावीत, नाहीतर ठाणेकर माफ करणार नाही”, असंही ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधून झाल्यानंतर त्यांनी ठाणे टोलनाक्याची पाहणी केली. यावेळी त्यांना टोलनाक्याची दुरवस्था दिसली. महिला स्वच्छतागृह व्यवस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra navnirman sena protest against toll price rises at thane toll plaza avinash jadhav detained by police sgk

First published on: 13-09-2023 at 18:14 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा