ठाणे – ठाणे शहरात प्रथमच महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे महिला साहित्य संमेलन रंगणार आहे. हे संमेलन शनिवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन कवयित्री उषाकिरण आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. तर, या संमेलनाच्या अध्यक्षपदी सानिया असणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध स्त्री संघटना आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ११ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. ‘वुमेन सेफ्टी ऑडिट’, मनुस्मृती नको संविधान हवे, युवकांसाठी ‘समता जागर अभियान’, विविध स्पर्धा, पोस्टर प्रदर्शने लावून चर्चा परिसंवाद असे अनेक कार्यक्रम या महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या माध्यमातून होतात. समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी प्रथमच महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने महिला साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. ठाणे शहरात या संमेलनाचे पहिले आयोजन केले जात असून शनिवार, १३ सप्टेंबर रोजी हे संमेलन पार पडणार आहे.

या संमेलनाच्या पहिल्या सत्रात संगीता सराफ आणि त्यांचे साथीदार क्रांतीगीते सादर करणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली मगदूम करणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘गेल्या पन्नास वर्षातील मराठी साहित्यातील स्त्री चित्रण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात कवयित्री नीरजा, हिनाकौसर खान, नीलिमा जाधव-बंडेलू, डॉ. अश्विनी तोरणे सहभागी होणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. वृषाली विनायक या करणार आहेत. तर, तिसऱ्या सत्रात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वर्तमानकालीन आव्हाने’ या विषयावर टॉक शो पार पडणार आहे.

या टॉक शोमध्ये राही भिडे, इंदुमती जोंधळे, जमीर कांबळे, चिन्मयी सुमित हे सहभागी होणार असून या सत्राचे सूत्रसंचालन शिल्पा कांबळे करणार आहेत. या संमेलनाच्या शेवटच्या सत्रात कवितावाचन होणार आहे. या कवितावाचन सत्रात छाया कोरेगावकर, संध्या लगड, शारदा नवले, नीलम माणगावे, विद्या भोरजारे, पाकिजा अत्तार, वैभवी अडसुळे,सुरेखा पैठणे, लक्ष्मी यादव सहभागी होणार आहेत. या सत्राचे सूत्रसंचालन कविता मोरवणकर करणार आहेत. यासत्राच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार असणार आहेत.