ठाणे – ठाणे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत मलेरियाचे ५० ते ५५ आणि डेंग्युचे १५ ते ३८ रुग्ण आढळून आले होते. मात्र, जून महिन्यात जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातच मलेरियाचे ५५ तर, डेंग्युचे ६५ रुग्ण आढळून आलेले आहेत. ठाणे वगळता इतर शहरात मात्र मलेरिया आणि डेंंग्युच्या रुग्ण संख्येत फारशी वाढ झालेली नाही.

दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यु रुग्ण संख्येत वाढ होते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून आरोग्य यंत्रणांकडून काळजी घेण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून निर्माणधीन इमारती, पंक्चर टायर दुरुस्ती दुकाने, गॅरेज, अशा सर्वांना पालिकेकडून नोटीसा बजावण्यात येतात आणि त्यात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. अशाचप्रकारे ठाणे महापालिकेने यंदाही काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी, शहरात डेंग्यु आणि मलेरिया रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात मलेरियाचे ३२२ तर, डेंग्यूचे १८७ आढळून आले आहेत. ठाणे जिल्ह्यात मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहेत. ठाणे जिल्ह्यात मे महिन्यात डेंग्यूचे ३८ तर, मलेरियाचे ५५ रुग्ण आढळले होते. तर, १ जून ते २६ जून या कालावधीत डेंग्यूचे ७९ तर, मलेरियाचे ७१ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात डेंग्यू ,मलेरियाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्रात मे महिन्यात डेंग्यूचे १५ रुग्ण तर, मलेरियाचे १६ रुग्ण आढळून आले होते. परंतू, जून महिन्यात या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. १ जून ते २६ जून या कालावधीत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे ६५ तर, मलेरियाचे ५५ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन

आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे, पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवणे, प्लास्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करणे, गटार, नाल्यांची नियमित सफाई, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत, डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरणे, डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे असे आवाहन ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्याची मलेरिया आणि डेंग्य रुग्ण (महापालिका निहाय्य)

महापालिकामलेरियाडेंग्यू
ठाणे१५६१०४
कल्याण डोंबिवली५८२६
उल्हासनगर०१०२
भिवंडी०७०६
नवी मुंबई २३११
मीरा भाईंदर६५०७
ठाणे ग्रामीण१२३१
एकूण३२२१८७