पित्याचे कृत्य ; मुंब्रा येथे सात वर्षीय बालिकेची हत्या

शनिवारी पहाटे अनिसने फोन सुरू केला आणि माहिराची हत्या केल्याचे पत्नीला सांगितले

ठाणे : मुंब्रा येथील संतोषनगर भागात अनिस मालदार खान (३३) याने त्याची सात वर्षीय मुलगी माहिरा हिचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

मुलीच्या हत्येनंतर अनिस यानेही विष प्राशन केले होते. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी अनिस विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष नगर परिसरात अनिस हा पत्नी आणि मुलगी माहिरासह राहतो.  शुक्रवारी रात्री अनिस आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी मुलीला घेऊन शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांकडे निघून गेली. अनिसही त्यांच्या मागोमाग निघून गेला. तिथेही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर अनिसने माहिराला पळवून दत्तुवाडी येथील निर्जनस्थळी नेले. पत्नीला मोबाईवर फोन करून माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे असे सांगून त्याने फोन बंद केला. त्यानंतर अनिसची पत्नी वारंवार त्याला संपर्क साधत होती. 

शनिवारी पहाटे अनिसने फोन सुरू केला आणि माहिराची हत्या केल्याचे पत्नीला सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने अनिसला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने विष प्राशन केले होते. पोलिसांनी तात्काळ  त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. माहिराच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलिसांनी अनिस विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man kills 7 year old daughter after argument with wife zws