ठाणे : भिवंडी येथील सरवली एमआयडीसीमध्य़े असलेल्या कापड गोदामाला शुक्रवारी सकाळी ९.२४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी कोनगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईला लागून असलेल्या भिवंडी परिसरात अनेक कारखाने आहेत. भिवंडी येथील सरवली एमआयडीसीमध्ये खत्री डाईंन ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये कापड निर्मितीचे गोदाम आहे. या गोदामात कापड बनविण्याचे तसेच कपड्यांना रंग देणाचे काम सुरू असते. शुक्रवारी सकाळी ९.२४ वाजताच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली.
कंपनीत कपड्यांचा साठा आणि रासायनिक पदार्थ असल्यामुळे आगीने अवघ्या काही क्षणात रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आग अधिकच पसरत गेली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी, कल्याण, उल्हासनगर अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
