कल्याण – कल्याण, डोंबिवली परिसरात गुरूवारी रात्री साठे वाजता अचानक आभाळ भरून आले. वादळी वाऱ्यांमुळे सर्वत्र धुळीचे लोट वाहू लागले. बघता बघता विजांचा कडकडाट सुरू होऊन वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट सुरू होताच डोंबिवली शहर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.
दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. अशात गुरूवारी रात्री साडे आठ वाजता अचानक वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. विक्रेते, व्यापारी, नागरिकांची पळापळ झाली. गर्दीने ओसंडून वाहू लागलेल्या बाजारपेठा काही क्षणात रिकाम्या झाल्या. घर गाठण्यासाठी नागरिकांची पळापळ उडाली. अशात रिक्षा वाहनतळांवरील रिक्षा चालक वादळी पावसाच्या भीतीने घरी निघून गेले. त्यामुळे कामावरून परतणाऱ्यांची, खरेदीदार नागरिकांची घरी जाण्यासाठी वाहन नसल्याने कोंडी झाली.
हेही वाचा >>> ठाण्यासह नवी मुंबईत अचानक जोरदार पावसाला सुरुवात, नागरिकांची उडाली धांदल
किल्ले बांधणीसाठी मश्गुल असलेल्या बच्चे कंपनीचा पावसाने सर्वाधिक हिरमोड केला. दिवसभर मेहनत घेऊन आम्ही किल्ला तयार केला होता. रंगरंगोटी सुरू असताना अचानक वारा, पावसाने सुरूवात केली. आमच्या मागील पाच दिवसांच्या मेहनतीवर पावसाने पाणी फेरले. आता नव्याने किल्ल्याची उभारणी, रंगरगोटी करावी लागेल, अशी माहिती ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील लक्ष्मी पार्क गृहसंकुलातील उत्कर्ष बाबर, अभिषा वाघचौरे, श्रेया शेलार, श्रावण चव्हाण, ख्रिस्तो टेकुदन, आरूष उगले, अव्दिता पाटील, वीर जोशी या विद्यार्थ्यांनी दिली.
अचानक आलेल्या पावसाने फटाके विक्रेत्यांचे सर्वाधिक नुकसान केले. जोरदार वादळी वाऱ्याने फटाके, फरळ विक्रीसाठी उभारलेले स्टाॅल उडून गेले, काही कोसळले. पाऊस सुरू होताच मांडवातून फटाक्यांवर पावसाच्या धारा सुरू झाल्या. फटाके पावसापासून वाचविताना विक्रेत्यांची दमछाक झाली. मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी बाजारात आलेल्या इतर नागरिकांसह कष्टकरी, मजुरांना बाजारपेठांमध्ये काळोख पसरल्याने, पाऊस, विजांच्या भितीने घरचा रस्ता धरावा लागला.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणाचे प्रतिबिंब दिवाळीच्या कंदिलावरही
दिवाळीनिमित्त अनेक गृृहसंकुलांच्या आवारात महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत. पावसाने रांगोळ्या पुसल्या गेल्याने महिला वर्गाचा हिरमोड झाला. गुरुवारी दुपारपासून आभाळ भरून आले होते. रात्री साडे आठ वाजता वादळी वारे सुरू होऊन त्यानंतर मुसळधार पावसाला विजांच्या कडकडाटात सुरूवात झाली. गर्दीने वाहत असलेल्या बाजारपेठा काही क्षणात रिकाम्या झाल्या. रस्तोरस्ती पाणी साचले आहे. कल्याणमधील अनेक भागात वाहन कोंडी झाली. कामावरून परतलेला नोकरदार रेल्वे स्थानक भागात अडकून पडला आहे. त्यामुळे रेल्वे स्थाकांवरील जिने, स्कायवाॅक गर्दीने भरून गेले आहेत. नऊ वाजता सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. विज पुरवठा बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.