डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यान उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाच्या कामातील महत्वपूर्ण टप्प्याचे काम बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विशेष मेगाब्लाॅक घेऊन रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले. या विशेष मेगा ब्लाॅकच्या काळात फलाट क्रमांक पाच आणि सहा मार्गिकेच्या दरम्यान आधार खांब उभारणी आणि त्यावर तुळया टाकण्याची कामे करण्यात आली.
या तुळया उचलणे आणि त्यासाठी आवश्यक सामग्री मंगळवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात रेल्वेने आणून ठेवली होती. बुधवारी रात्री बारा वाजल्यानंतर सुमारे शंभरहून अधिक कामगारांच्या साहाय्याने आणि अत्याधुनिक क्रेन यंत्रणेच्या साहाय्याने फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या दरम्यान पुलाचे लोखंडी आधार खांब आणि त्यावर तुळया ठेवण्याची आव्हानात्मक कामे करण्यात आली. तीन तासाचा विशेष रेल्वे मेगा ब्लाॅक असल्याने त्या अवधीत रेल्वेला ही कामे पूर्ण करायची होती.
बुधवारी रात्री डोंबिवली पूर्वेतील डाॅ. राॅथ रस्त्या लगतचा फलाट क्रमांक सहा आणि पाचच्या दरम्यान पायाचे उभे लोखंडी खांब बसविण्यात आले. त्यानंतर या खांबांना आधार देणाऱ्या नऊ लोखंडी जोडण्या बसविण्यात आल्या. या आधार खांबांंवर सहा लोखंडी तुळया बसविण्यात आल्या. फलाटावरील १२ मीटर परिसरात ही कामे करण्यात आली. या कामासाठी रेल्वेने कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या जागोजागी थांबून ठेवल्या होत्या. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक प्रवासी वर्दळीचे ठिकाण आहे. या रेल्वे स्थानकातील वाढत्या गर्दीचा भविष्यकालीन विचार करून रेल्वेने डोंबिवली रेल्वे स्थानकात मध्यभागी फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाच एकाच मार्गिकेने जोडणारा पूल उभारणीचे काम गेल्या वर्षापासून सुरू केले आहे. गेल्या वर्षभरात या पुलाच्या कामातील फलाटावरील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र, मासिके विक्री, खाऊची दुकाने आणि इतर कार्यालये स्थलांतरित करण्यात आली. पावसाळ्यात पुलाची कामे संथगतीने सुरू होती. आता पावसाने मुक्काम हलविल्याने या पुलाच्या कामाला गती आली आहे.
या पुलामुळे फलाटावर जाणाऱ्या आणि फलाटावरून जिन्यावर येणाऱ्या गर्दीचे विभाजन होण्यास मदत होणार आहे. या नवीन पुलानंतर पंडित दिनदयाळ चौक ते रामनगर रेल्वे तिकीट खिडकी असाही एक नवीन पादचारी पूल रेल्वेकडून प्रस्तावित आहे. या पुलाच्या उभारणीनंतर ते काम हाती घेतले जाण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.