बदलापूरः गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बारवी धरणात ८३ टक्के पाणी साठा झाला होता. त्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बारवी धरण कधीही ७२.६० मीटर ही उंची गाठू शकत असल्याने कधीही धरणातून स्वयंचलित वक्रद्वारांवाटे विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बारवी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची, गावांची औद्यगिक वसाहतींची तहाण भागवणारे बारवी धरण यंदा मे महिन्यापासून भरू लागले. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच धरण निम्म्याहून अधिक भरले होते. गेल्या काही दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे. परिणामी धरण वेगाने भरते आहे. शुक्रवार २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत बारवी धरणात तब्बल ८३ टक्के पाणीसाठा झाला होता. विशेष म्हणजे सकाळी ८ वाजता हाच पाणीसाठा ८१ टक्के इतका होता. त्यामुळे बारवी धरणाने त्याची ७०.६० मीटर इतकी उंची दुपारी ३ वाजताच गाठली.

बारवी धरणाची एकूण उंची ७२.६० इतकी आहे. संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात धरणात येणारा संभाव्य येवा वाढतो आहे. त्यामुळे बारवी धरणाची पातळी वाढून बारवी धरणाचे स्वयंचलीत वक्रव्दारे (दरवाजे) येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे. परिणामस्वरुप बारवी धरणातून कोणत्याही क्षणी बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यामुळे बारवी नदीकाठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मो-याचापाडा, चोण, रहाटोली, नदी काठावरील इतर शहरे आणि शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची एमआयडीसी प्रशासनाने विनंती केली आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना व पर्यटकांना प्रवेश न देणेबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्याबाबतही सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास बारवी नदी आणि पर्यायाने उल्हास नदीत कल्याण तालुक्यातील आपटी गावापासून पुढे पाण्याचा प्रवाह वाढतो. त्याचवेळी कर्जत तालुक्यात पाऊस सुरू असल्यास आणि बदलापुरातही पावसाचा जोर असल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ठाणे जिल्ह्याची जलचिंताही मिटणार आहे.

यंदा बारवी लवकर काठोकाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यात सुरू झालेला पाऊस, त्यानंतर लवकर आलेला मोसमी पाऊस आणि ऐन महिन्यात न झालेले बाष्पीभवन यामुळे यंदा बारवी धरणात कमी वेळेत विक्रमी पाणीसाठा झाला. गेल्या सहा वर्षात यंदा असलेला पाणी साठा होऊ शकला नव्हता. सध्या सुरू असलेला पाऊस आणखी तीन ते चार दिवस राहिल्यास यंदा जुलै महिन्यातच बारवी पूर्ण क्षमतेने भरून वाहू शकते. यापूर्वी २०२२ मध्ये २४ जुलै रोजी धरणात ७९ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ८३ टक्क्यांहून अधिक आहे.