– ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे होणाऱ्या प्रदुषणाचे प्रकरण

ठाणे : विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या माध्यमातून विकास करताना उद्धवस्त झालेली हिरवळ, कापलेली झाडे, वाढलेले प्रदुषण आणि त्यामुळे फुफ्फसाचे आजार जडत आहेत. एमएमआरडीएच्या अहवालानुसार येथून दररोज ५० वाहनांची वाहतूक होणार आहे. त्यामुळे येथील निसर्गसंपदा पाहून घरे विकत घेणाऱ्या नागरिकांना मानसिक धक्का बसला आहे, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ठाणे – बोरीवली भुयारी मार्गाला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, अशी नागरिकांसह आपली मागणी असून त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएशी झगडण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारचा अंत्यत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे -बोरीवली भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनी अपेक्स पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र, त्यावर निर्णय झाला नसल्यामुळे या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना केली होती. त्यानुसार, रविवारी काॅसमाॅस लाऊंज क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आव्हाड यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणमध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली. आता त्यांना मानसिक धक्का बसला आहे. दररोज येथून ५० हजार गाड्या जाणार असतील तर वाढणारे प्रदुषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे. आता लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे. तसे पाहता, हा छोटा प्रश्न आहे. पण, तो सोडविण्याची सरकारची मानसिकता हवीय. हा लढा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे. हा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, यासाठी मी आग्रह धरणार आहे, असेही ते म्हणाले. विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना, त्यामुळे ठाणे – बोरीवली भुयारी मार्गाला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा, अशी नागरिकांसह आपली मागणी आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएशी झगडण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकट बोगद्याला जोडणारा हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून येथे टोल नाका ही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलतील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या मार्गाच्या कामामुळे येथून डम्परद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक येथून वाहतुक करतात. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येत आहे. यामुळे येथील हरित पट्टा नष्ट होत आहे. ठाणे-बोरीवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी आव्हाड यांच्यासमोर मांडली.