scorecardresearch

ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणारे अटकेत ; ११ मोटार सायकल, सोन्याचा ऐवज हस्तगत

आरोपी चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ काढून पळून गेले होते.

ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणारे अटकेत ; ११ मोटार सायकल, सोन्याचा ऐवज हस्तगत
ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणारे अटकेत ; ११ मोटार सायकल, सोन्याचा ऐवज हस्तगत

कल्याण : आंबिवली येथील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची ६० हजार रुपये किमतीची माळ गेल्या आठवड्यात पहाटेच्या वेळेत चाकुचा धाक दाखवुन दोन भामट्यांनी काढून घेऊन पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना खडकपाडा पोलिसांनी कल्याण मधील मोहने येथील दोन इसमांना अटक केली. या इसमांच्या चौकशीत त्यांनी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात ११ मोटार सायकली, सात पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी बुधवारी येथे दिली.

आंबिवली येथे राहणाऱ्या लता साठे (५२) शुक्रवारी पहाटे पाच वाजता आंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने कामाला चालल्या होत्या. त्यांना लहुजी नगर कोपऱ्यावरील रस्त्यावर दोन इसमांनी दुचाकी वरुन येऊन अडविले. त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ काढून पळून गेले होते.खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड याप्रकरणाचा तपास करत होते. तपास करत असताना लता साठे यांची सोन्याची माळ चोरणारे दोन इसम मोहने येथील लहुजी नगरमध्ये रात्री बारा वाजता येणार आहेत अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला. ठरल्या वेळेत दोन इसम त्या भागात घुटमळू लागले. साध्या वेशातील एका पोलिसाने एका इसमाला हटकताच तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच दुसरा साथी पळून जाऊ लागला. गस्तीवरील पोलिसांनी त्याला पकडले.

हेही वाचा : डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकात ७२ पायऱ्यांचा गड ;७२ पायऱ्यांचा जिना चढताना प्रवाशांची दमछाक

दोघांना खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्यांनी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, मुंब्रा, अंबरनाथ, बदलापूर शहरात ११ मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. लता साठे यांची सोन माळ याच आरोपींनी चोरली होती. सुनील उर्फ सोन्या शंकर फुलोरे (२०), गणेश नागनाथ जाधव (२६) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी मोहने येथील पोलीस चौकी मागील लहुजी नगर भागात राहत होते. आरोपींनी सुझुकी, पल्सर, टीव्हीएस दुचाकी चोरल्या आहेत. चुनाभट्टी, बदलापूर, सीबीडी, शांतीनगर भिवंडी, टिळकनगर, खडकपाडा, शिवाजीनगर अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी, मंगळसुत्र चोरीचे गु्न्हे केले आहेत, अशी माहिती उपायुक्त गुंजाळ यांनी दिली. चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : विमा बंद करण्याच्या नावाखाली २६ लाखांचा गंडा ; उल्हासनगरातील महिलेला फसवले, गुन्हा दाखल

साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडाचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार केंचे, साहाय्यक निरीक्षक अनिल गायकवाड, नितीन आंधळे, हवालदार मधुकर दाभाडे, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, अशोक पवार, सुनील पवार, सदिशव देवरे, राजू लोखंडे, बिजू शेले, योगेश बुधकर, राहुल शिंदे, दीपक थोरात, अनंत देसले, विशाल राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या