डोंबिवली-दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या कोपर रेल्वे स्थानकातील पूर्व बाजुला नव्याने बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या जिन्याला ७२ पायऱ्या आहेत. पाच टप्प्यांमध्ये असलेल्या या पायऱ्या चढताना प्रवाशांची दमछाक होत आहे. ही दमछाक टाळण्यासाठी अनेक प्रवासी जिना असुनही रेल्वे मार्गातून फलाटावर येजा करतात.या जिन्याच्या बांधणी विषयी अनेक जागरुक प्रवाशांनी रेल्वेच्या वरिष्ठ, स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. अधिक माहितीसाठी मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा >>> कल्याण परिवहन क्षेत्रात विद्युत वाहनांची संख्या १३०० वर

कोपर रेल्वे स्थानकात दिवा बाजुने जिना नसल्याने कोपर, आयरे, आगासन, दातिवली, म्हातार्डेश्वर परिसरातील रहिवासी कोपर रेल्वे स्थानकात उतरुन इच्छित स्थळी जात होते. रेल्वे मार्गातून येजा करत त्यांचा अनेक वर्ष प्रवास सुरू होता. या भागात वाढते अपघात होत असल्याने मुंबई रेल्वे विकास मंडळाने दोन वर्षापासून कोपर रेल्वे स्थानकात दिवा बाजुने जिना उभारणीचे काम सुरू होते. गेल्या महिन्यात हे काम पूर्ण करुन पादचारी जिना प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.या जिन्याचे टप्पे मोठे असल्याने जिन्यावरुन येजा करताना प्रवाशांची दमछाक होत आहे. कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजुला जिन्याला ७२ पायऱ्या आहेत. या जिन्यावरुन जाऊन लोकल पकडणे अनेक प्रवाशांना अवघड होत आहे. काही प्रवाशांना हदयरोग, इतर व्याधी आहेत. त्यांना हे जिने चढताना सर्वाधिक त्रास होत आहे. ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना जिन्यावरुन येजा करताना काही वेळ टप्प्यांवर थांबून मग पुढे जावे लागते.

हेही वाचा >>> तिप्पट योजनेतील फसवणूक प्रकरणी आणखी एक अटकेत

या जिन्याची एक बाजू दिवा दिशेने उतरवली आहे. या जिन्याचा वापर दातिवली, आगासन, कोपर पूर्व, आयरे भागातील रहिवासी करतील असे रेल्वे प्रशासनाचे नियोजन होते. जिन्याला सर्वाधिक पायऱ्या असल्याने शाळकरी मुले, महिला वगळता नोकरदार वर्ग या जिन्याचा वापर करणे टाळत आहेत, असे या जिन्या जवळ राहत असलेल्या आयरे पूर्व भागातील रहिवाशांनी सांगितले.कोपर रेल्वे स्थानकातील जिना रेल्वे मार्ग ओलांडून कोपर पूर्व भागात उतरविण्यात आला आहे. जिना उतरविताना मिळालेल्या उपलब्ध जागेचा वापर करुन जिन्याची बांधणी केली आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.कोपर रेल्वे स्थानकातील जिन्याच्या ७२ पायऱ्या दररोज चढून लोकल पडणे शक्य होत नाही. या पायऱ्या चढताना दम लागतो. हा एक मोठा व्यायाम आहे. घरातून धावपळ करत लोकल पकडायची. त्यात आता जिन्यांचा मोठा डोंगर चढावा लागतो. केशव मोरे ,प्रवासी, आयरे