ठाणेः कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील वाहतुकीच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या.
अंबरनाथ येथे रेल्वे स्थानक परिसरात सुमारे ८० कोटी रुपयांच्या निधीतून सॅटिस उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेबाबत आढावा घेऊन लवकरच त्यावर तोडगा काढण्याचे आणि कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी कल्याण रिंग रोड या प्रकल्पाच्या कामाची स्थिती तपासण्यात आली. आठ टप्प्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या रस्त्याचे चार टप्पे जवळपास पूर्ण झाले असून उर्वरित टप्प्यांसाठी भूसंपादन आणि आरेखनाच्या कामाला वेग देण्याची सूचना करण्यात आली.
वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिळफाटा–रांजनोली येथे द्विस्तरिय (डबल डेकर) रस्ता उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठीची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रो ५ प्रकल्पाचा विस्तार बदलापूर व अंबरनाथच्या मध्यवर्ती भागापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मेट्रोमुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. याचप्रमाणे मेट्रो १२ च्या कामालाही वेग देण्याचे निर्देश खासदारांनी दिले.
बैठकीत अंबरनाथ–बदलापूर–उल्हासनगर संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. तिन्ही पालिकांनी समन्वय साधून हे काम लवकर पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले. डोंबिवली स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथे देखील सॅटिस प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर यू-टाईप रस्ता आणि इतर महत्वाच्या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने करण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राय, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, विविध विभागांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र चौधरी, राजेश कदम, रवी पाटील, रमाकांत देवळेकर, रमाकांत मढवी, बाबाजी पाटील, पप्पू पिंगळे, सागर जेधे, कुणाल भोईर यांच्यासह कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर देखील उपस्थित होते.
या बैठकीतून स्पष्ट झाले की, कल्याण लोकसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात सुरु असलेले रस्ते, मेट्रो, सॅटिस आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारखे महत्वाचे प्रकल्प आगामी काळात नागरिकांच्या सोयीसाठी अधिक वेगाने प्रत्यक्षात उतरणार आहेत.