शहापूर : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर सरलांबे गावच्या हद्दीत एका खासगी बस गाडीच्या पाठीमागील चाकाला अचानक आग लागून गाडीने पेट घेतला. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही आग लागली. बसचालक हुसेन सय्यद यांच्या प्रसंगावधानाने चालक आणि वाहकासह १४ प्रवासी सुखरूप उतरवण्यात आले.
मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरून बोरीवलीहून छत्रपती संभाजीनगर येथे ही बस जात होती. या बस गाडीमध्ये चालक, वाहकासह १४ प्रवासी होते. भिवंडी येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास बस गाडीतून वास येऊ लागला होता.
चालक हुसेन सय्यद यांनी बस गाडीचा वेग कमी केला असता, पाठीमागील चाक फुटून गाडीने पेट घेतला. चालकाने तत्परतेने बस थांबवत प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. याबाबत शहापुर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शहापुर नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे शहापुर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या कंपनीच्या अन्य बसमधून प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
