IND vs PAK Asia Cup 2025 / ठाणे : अबुधाबी येथे १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उबाठाने विरोध केला आहे. मुळात अशिया चषकातील हा आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वीही तणावाच्या वेळी काँग्रेस सत्तेत असताना दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळले गेले आहेत. मात्र रोज पाकिस्तानचे गोडवे गात काँग्रेसची भूमिका मांडणाऱ्या आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला या सामन्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार नाही. “शेंदूर उडालेल्या दगडांनी ‘सिंदूर’ची काळजी करू नये, अशी टिका शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी उध्दव ठाकरेंवर केली.

पाकिस्तानबाबतच्या देशाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही, तोवर दोन देशात सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊच शकत नाहीत, ही एनडीए भूमिका होती आणि आजही तीच भूमिका आहे. अशिया चषकात एक क्रिकेट सामना खेळल्याने त्यात बदल झाला असे म्हणणे चुकीचे आहे.

दोन देशात क्रिकेट नाही तर कोणतेच सामने होत नाहीत. पाकिस्तानी खेळाडूंना अजूनही आयपीएलचे दरवाजे बंद आहेत. मात्र जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा (चषक) होतात, तेव्हा पूर्वीही असे सामने झाले आहेत. विश्वचषकात आपण खेळलो असल्याची आठवण खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठाच्या नेत्यांना आज करुन दिली.

निर्लज्जपणा म्हणतात

आमच्याविरोधात उबाठाचे नेते रोज उर बडवत असतात. परंतु क्रिकेट सामन्याला विरोध करतांना पंतप्रधानांबाबत बोलताना आपण काय शब्द वापरतो, त्याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आपली पात्रता, आपली कुवत ओळखून बोलले पाहिजे. ज्या लोकांविरोधात निवडणुका लढवल्या, त्यांच्या सोबत सत्तेत बसणे याला निर्लज्जपणा म्हणतात.

हिंदुत्वाचा विचार सोडून सत्तेसाठी लाचारी स्वीकारण्याला निर्लज्जपणा म्हणतात. मुंबईच्या गुन्हेगाराला, बॉम्बस्फोटातल्या आरोपींना प्रचारात घेऊन फिरण्याला निर्लज्जपणा म्हणतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी उध्वव ठाकरे यांच्यावर केली आहे.

‘सिंदूर’ ची काळजी करू नका

खरे तर ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत संशय व्यक्त करणाऱ्या, देशाच्या जवानांनी गाजवलेल्या शौर्यावर शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना सिंदूर बाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्यांनी सिंदूरचा अवमान केला आहे. आता निवडणुका आल्याने त्यांना सन्मान शब्द आठवला का? निवडणूक प्रचारात आयएसआयच्या हस्तकांना आणि बॉम्बस्फोटातल्या आरोपींना घेऊन फिरणाऱ्यांनी सिंदूर सारखे पवित्र शब्द उच्चारूही नयेत. देशाचे संरक्षण करण्यासाठी मोदी आणि शाह यांचे नेतृत्व समर्थ आहेत. बाजारबुनग्यांनी त्याची चिंता करू नये, असे म्हस्के म्हणाले.

कुवतीच्या पलिकडचा विषय

पहलगामचा हल्ला झाला, तेव्हा उद्धव ठाकरे हे परदेशात टूर करत होते. मात्र त्यानंतर एकाही पिडित बहिणीची साधी विचारपूसही केली नाही. आता ते `माझं कुंकू, माझा देश..’ असे अभियान राबवणार आहेत. २०१९ साली एकाशी लग्न, दुसऱ्याशी संसार हे अभियान राबवले होते. काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले होत असताना भारत पाकिस्तानात जाऊन क्रिकेटचे सामने खेळला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या कुवतीच्या पलिकडचा विषय आहे, अशी टिका म्हस्के यांनी केली आहे.