ठाणे : ठाणे शहरातील तलाव प्रदुषित होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपुरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मीती करत आहे. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवातही कृत्रिम तलाव संकल्पनेस ठाणेकरांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले आहे. ठाण्यातील कृत्रिम तलवात १,६९१ देवी मूर्तीचे तर, १०,५६२ घटाचे विसर्जन झाले. ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात एकेकेळी ७५ हून अधिक तलाव होते. अतिक्रमणामुळे शहरात अनेक तलाव नामशेष पावले असून शहरात सद्यस्थितीत ३६ तलाव शिल्लक राहिले आहे.
या तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातूनच गेल्या काही वर्षांपासून पालिका पर्यावरणपुरक विसर्जन संकल्पना राबवित आहे. यात तलावांचे पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात आहे. त्यास दरवर्षी नागरिकांकडून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.गुरुवारी रात्री ठाणे शहरात देवी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशे, डिजेचा वापर करत वाजत गाजत मिरवणुका निघाल्या होत्या. मिरवणुकांमध्ये गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. पालिकेने शहरात दहा कृत्रिम तलाव, पाच ठिकाणी लोखंड़ी टाक्या आणि आठ विसर्जन घाट, या ठिकाणी मुर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती. एकूण १०५६२ घटांचे विसर्जन झाले तर, १२२५३ देवी मूर्तीचे विसर्जन झाले. यात ४२४ घरगुती मूर्ती तर, १,२६७ सार्वजनिक मूर्तींचा समावेश होता.
सर्वाधिक मूर्ती विसर्जनाचे केंद्र जवाहर बाग कृत्रिम तलाव ठरले. येथे तब्बल ३३३४ मूर्ती आणि घटाचे विसर्जन झाले. त्यानंतर मासुंदा तलावात २३७७, खारेगाव तलाव ६१, मीठबंदर तलाव ६३१, रायलादेवी तलाव २९३, कोलशेत घाट १६३५, रेवाळे तलाव ३१३, पारसिक तलाव ९९२, शंकर मंदीर तलाव ३५५, दिवा-दातिवली गणेश घाट २०५, खिडकाळी तलाव २२९, उपवन कृत्रिम तलाव १३२८ आणि गायमुख घाट ९४, मूर्ती आणि घटाचे विसर्जन झाले.