ठाणे : राज्यातील ट्रीपल इंजीनच्या सरकारची तिजोरी पुर्णपणे रिकामी झालेली असतानाही केवळ प्रकल्पांच्या घोषणा करून लाडका ठेकेदार आणि पदाधिकाऱ्यांची पुढची सोय करण्यासाठी लाखोकरोडो रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरवला जातो आणि त्यानंतर कंत्राट काढले जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केला. तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी ठाण्यात येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, पेपर घोटाळे, स्थलांतरित होत असलेले उद्योग यासह २० प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणीही यावेळी केली.

ठाण्यातील घोडबंदर भागात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंडीया आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना (ठाकरे गट) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित करत त्याची उत्तरे देण्याचे आव्हान पंतप्रधान मोदी यांना दिले. मागील अडीच वर्षात राज्य कर्जबाजारी झाला आहे. यापुढे राज्याला कर्जही घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. एकेकाळी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता गुन्हेगारीत आघाडीवर आहे. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात देखील वाढ झाली, त्यामुळे राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. मागील १० वर्षात राज्यातील २० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारच्या काळात ८ पेपर फुटीची प्रकरणे आणि घोटाळे झाले आहेत. तलाठी घोटाळा देखील गाजला होता, असा आरोप आव्हाड यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा शोध घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>मैत्रिणीचे ‘ते’ छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून बांधकाम व्यवसायिकाची हत्या

राज्याला १ ट्रिलियन यूएस डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ट्रीपल इंजिन सरकार ते साध्य करू शकलेली नाही. राज्यातील युवकांना १ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात १२ हजार सुध्दा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. महाराष्ट्र बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. वेदांता-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि बल्क ड्रग पार्कसारख्या मोठ्या प्रकल्पांना राज्याबाहेर जात आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच सर्व २७ महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नसून त्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. या सरकारने निवडणूक न घेऊन लोकशाहीचा गळा घोटला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून स्थानिक गावकऱ्यांच्या जमिनीवर अवैध कब्जा केला जातो. मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे असूनही महिला विरोधी गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारने मान्यता दिली होती, तरी आता केंद्र सरकार का टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी केला. ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीच्या उभारणीसाठी अद्याप जागा ताब्यात आलेली नसतानाही त्याचे भुमीपुजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीने उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी ठाण्याच्या कार्यक्रमात द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अजित पवार हे शरद पवारांना सोडून जाऊ शकतात तर, ते कुणालाही सोडून जाऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापूरमधील अमानवी घटनेचा आरोपी अक्षय शिंदेला चकमकीत ठार केले. पण संस्थाचालक तुषार आपटेचे काय? तो भाजप पदाधिकारी आहे म्हणून त्याला वाचवत आहात का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अक्षयकडे काही गुपीते तर नव्हती ना ? ज्यामुळे संस्थाचालक आणि सरकार अडचणीत येणार होते. त्यामुळेच त्याला ठार तर केले नाही ना, अशी शंकाही आव्हाड यांनी उपस्थित केली.