ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पूलांवर प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई दिशेकडे नवा पादचारी पूल प्रस्तावित केला आहे. हा पूल फलाट क्रमांक एक, पाच आणि सहावर उतरणारा आहे. तसेच स्थानकाच्या पूर्व पश्चिमेला जोडणारा आहे. या नव्या पूलामुळे प्रवाशांचा इतर पादचारी पूलांवर होणारा भार मोठ्याप्रमाणात हलका होणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात ते आठ लाख प्रवाशांची ये-जा होत असते. मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेसह ठाणे -नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा भार देखील ठाणे रेल्वे स्थानकात असतो. रेल्वे स्थानकात १० फलाट असून स्थानकात सहा पादचारी पूल आहेत. या पूलांवर प्रवाशांची तुफान गर्दी असते. सकाळी आणि रात्रीच्या वेळेत गर्दी वाढल्यास प्रवाशांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. मागील वर्षी पावसाळ्यात गर्दीमुळे पादचारी पूलांच्या जिन्यावर चेंगरा चेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या अनेक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्या होत्या.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहावर नेहमी गर्दी असते. यातील फलाट क्रमांक पाच हा कर्जत, कसारा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांसाठी आहे. तर फलाट क्रमांक सहावरुन मुंबई दिशेकडे वाहतुक करणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या धावतात. या फलाटांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील थांबा आहे. त्यामुळे या फलाटांवर उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांचा भार देखील वाढत असतो. काही महिन्यांपूर्वी फलाटावर होणाऱ्या गर्दीमुळे येथील फलाट क्रमांक पाचची रुंदी देखील वाढविण्यात आली होती. आता पादचारी पूल, जिन्यांवर होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई दिशेकडे नव्याने पादचारी पूल उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडील फलाट क्रमांक एकवर हा पूल उभारला जाणार असून तो पूर्वेला जोडला जाणार आहे. तसेच या पादचारी पूलाचे जिने फलाट क्रमांक एक, फलाट क्रमांक पाच, सहाला जोडले जाणार आहेत. तसेच हा पूल पूर्वेकडील भागात उतरता असणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला जाणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. येत्या महिन्यांत या पूलाच्या कामाबाबत रेल्वे मंडळाची मंजूरी मिळणार आहे. त्यानंतर निधी मंजूर झाल्यास पूलाचे काम सुरू होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली.