अंबरनाथ : दीर्घ प्रतीक्षेनंतर अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णपान लिहिले जाणार आहे. शहरात बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा नव्या नाट्यगृहाचे लोकार्पण लवकरच केले जाणार आहे. सुरुवातीला येत्या रविवार, १९ ऑक्टोबर रोजी हा लोकार्पण सोहळा होईल अशी माहिती होती. मात्र काही कारणांमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती रात्री उशिरा देण्यात आली. नाट्यगृहाच्या कामांवर शेवटचा हात फिरवला जात असला तरीही या नाट्यगृहाला कोणाचे नाव दिले जाणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि कलाकारांच्या संघटनांकडून वेगवेगळ्या नावांच्या मागण्या होत असल्याने नाट्यगृहाच्या नावावरून मोठा संभ्रम आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
या नाट्यगृहाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि पुढाकाराने हे नाट्यगृह साकार झाले आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील सर्कस मैदान परिसरात बांधण्यात आलेले हे नाट्यगृह ३८.७१ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आले आहे. शहरातील सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.
नाट्यगृहाची वैशिष्ट्ये
आधुनिकतेने सुसज्ज या नाट्यगृहात एकाच वेळी ६५८ प्रेक्षक नाट्यप्रयोगाचा आनंद घेऊ शकतात. मुख्य सभागृहासोबतच दोन छोटे सभागृह, कार्यशाळा व प्रदर्शन स्थळ, मान्यवर अतिथींसाठी खास खोल्या, ग्रीन रूम, क्राय रूम, उपहारगृह, तिकीटगृह, तसेच प्रशस्त चारचाकी व दुचाकी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. वास्तूच्या सौंदर्य आणि कार्यक्षमतेसाठी खासदार शिंदे यांनी स्वतः अनेक वेळा पाहणी करून आवश्यक सुधारणा सुचवल्या होत्या.
नाटकांची मेजवानी
या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विविध नाटकांचे प्रयोग येथे रंगणार आहेत. जुन्या नव्या नाटकांची मेजवानी अंबरनाथ, बदलापूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. त्याची माहिती लवकरच दिली जाईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मराठी कलाविश्वाची प्रमुख उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्यास महेश कोठारे, महेश मांजरेकर, अशोक पत्की, उषा नाडकर्णी, विजय गोखले, अलका कुबल, विजय पाटकर, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर यांसारख्या मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आयोजकांकडून कलाकारांना आमंत्रित करण्याची लगबग सुरू आहे.
नावावरून रंगलेली चर्चा
अंबरनाथच्या या नव्या नाट्यगृहाचे लोकार्पण आता काहीच दिवसांवर येऊन ठेपले असले तरी त्याच्या नावावरून मात्र चर्चा चांगलीच रंगली आहे. काही संघटनांकडून कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचे नाव द्यावे अशी मागणी होत आहे, तर काही पक्ष आणि गटांकडून राजकीय नेत्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने अद्याप अंतिम निर्णय जाहीर न केल्याने,‘अंबरनाथ नाट्यगृहाला कोणाचे नाव लाभणार?’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर शहराला मिळणारी ही सांस्कृतिक भेट निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे; मात्र नाट्यगृहाच्या नावावरचा गोंधळ निवळेपर्यंत अंबरनाथची ‘तिसरी घंटा’ थोडी उत्कंठेची ठरणार आहे.