ठाणे वाहतूक शाखेची नवी उपाययोजना

ठाणे : ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांमधील वाहतुकीवर देखरेख करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये मचाण उभारण्याचा  निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सर्वाधिक वर्दळीचे आणि कोंडीचे केंद्र असलेल्या कल्याण-शीळ मार्गावरील चौकात १५ फू ट उंचीची मचाण उभारण्यात आली असून त्यावरून दुर्बीण, भोंगा आणि वॉकीटॉकी यांसारख्या यंत्राच्या साहाय्याने चालकांना तसेच वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना सातत्याने सूचना केल्या जात आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे येतात. या शहरांचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्या तुलनेत शहरातील रस्ते अपुरे पडू लागले असून यांमुळे रस्त्यांवर जागोजागी कोंडी होताना दिसून येत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शहरातील प्रमुख चौकामध्ये मचाण उभारून त्याद्वारे वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सर्वाधिक वर्दळीचे आणि कोंडीचे केंद्र असलेल्या कल्याण-शीळ मार्गावरील चौकात १५ फूट उंचीची मचाण उभारण्यात आली आहे.

योजना काय?

’ ठाणे वाहतूक पोलिसांनी कल्याण फाटा भागात १५ फूट उंच मचाण उभारली आहे. त्याआधारे नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली भागातील वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी मचाणावरून वाहतूक नियोजनाचे काम पाहणार आहेत.

’ या मचाणावर एक भोंगा, एक दुर्बीण असणार आहे. तसेच वॉकीटॉकी यंत्राप्रमाणे एक यंत्र असणार आहे. या यंत्राद्वारे मचाणावरील पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असणार आहेत. तसेच दुर्बीणद्वारे सुमारे साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर लक्ष ठेवता येणार असून त्याद्वारे एखादी दुर्घटना झाल्यास त्याची माहिती तात्काळ  देणे शक्य होणार आहे.

’ मचाणावर बसविण्यात आलेल्या भोंग्याद्वारे पोलीस कर्मचारी वाहनचालकांसह रस्त्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबतचे संदेश देणार आहेत. त्यामुळे एखाद्या मार्गावर कोंडी झाली तर, त्या मार्गावर वाहने सोडण्याऐवजी पर्यायी मार्गावरून वाहतूक सोडून कोंडी कमी करणे शक्य होणार आहे.

कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीवर लक्ष ठेवून ती सुरळीत ठेवण्यासाठी तिथे मचाण उभारण्यात आली आहे. अशाचप्रकारे शहरातील ज्या भागात कोंडीचे प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणीही मचाण उभारण्याचा विचार सुरू आहे.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.