कल्याण : कल्याण जवळील मलंग गडावर माघी पौर्णिमेनिमित्त मोठा जत्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम होतात. या उत्सवांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी सकाळी साडे आठ वाजता मलंगगडावर येऊन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आरती, दर्शन सोहळ्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी येथे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या उत्सवाच्या निमित्ताने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडावर येणार असल्याने हजारो हिंदू भाविक, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी गडावर उपस्थित राहणार आहेत. अतिशय शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडेल, असे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा… ठाणे: माझ्याविरोधात आता कशाकशाचा वापर होतोय, ते बघुया; जितेंद्र आव्हाड यांचे विधान

मलंगगडावरील हिंदुंची वहिवाट आणि तेथील धार्मिक परंपरा जपण्यासाठी हक्काचा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरुन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी १९८० पासून मलंग गडावर माघी पौर्णिमेनिमित्त उत्सवास सुरूवात केली. ५० वर्षाहून अधिक काळ ही उत्सव परंपरा सुरू आहे. आनंद दिघे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा लढा पुढे चालू ठेवला आहे. मुख्यमंत्री असल्यामुळे मलंग गड यात्रोत्सवाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी दर्शन सोहळ्यासाठी गडावर येण्याचे आश्वासन दिले आहे, असे लांडगे यांनी सांगितले.

हेही वाचा… सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीत दूषित पाण्याचा पुरवठा

पौर्णिमेनिमित्त ठाणे, मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागातील भाविक मलंग गडावर दर्शनासाठी येतात. या उत्सव कार्यक्रमात हिंदू महासभा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू मंच या हिंदू धर्म संघटना सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री गडावर येणार असल्यामुळे मलंग गड संस्थान कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा म्हणून कामाला लागले आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी महसूल, पोलीस यंत्रणांनी सुसज्जतेची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा… उल्हासनगरः प्रदुषणामुळे उल्हास नदीत पुन्हा जलपर्णी;जलपर्णीची वेगाने वाढ, पाणी उचल केंद्रांना धोका

मलंगगडचा विकास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावर येणार असल्यामुळे गडावरील अनेक वर्षाचा पाणी प्रश्न, रस्ते, पायवाटा, बाजारपेठ रचना, फ्युनिक्युलर ट्राॅलीचा मागील १० वर्षापासून रेंगाळलेला प्रकल्प, गड परिसरातील रस्ते, पाण्याचे प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा स्थानिक नागरिक आणि भाविकांना आहे. मलंगगडावर जाण्यासाठी रोप वेची व्यवस्था नसल्याने भाविकांना दोन तास गडावर पायी चालत जावे लागते. भाविकांना १० मिनिटात गडावर जाता यावे म्हणून मलंग वाडी ते गड दरम्यान फ्युनिक्युलर ट्राॅलीचा प्रकल्प १० वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात हाती घेण्यात आला होता. सरकारे बदलली. निधीचे प्रश्न निर्माण झाले. जुने ठेकेदार देयक थकल्याने कामे सोडून निघून गेले. त्यामुळे मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्राॅलीचा विषय रखडला, असे स्थानिकांनी सांगितले. आ. किसन कथोेरे यांनी ट्राॅलीचा विषय मार्गी लावण्यासाठी यापूर्वी शासन पातळीवर प्रयत्न केले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occassion of maghi purnima cm eknath shinde going to attend programs at malangad on sunday asj
First published on: 03-02-2023 at 11:54 IST