ठाणे : मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे गुरुवारी रात्री विसर्जन झाले. या गणेशमूर्ती शीळ-डायघर येथील डम्पिंग ग्राऊंडजवळील प्रकल्पात टाकण्यात आल्याने स्थानिकांनी या घटनेविषयी तीव्र विरोध केला. नागरिकांनी गणेशमूर्तींच्या या गाड्या परतवून लावल्या. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या घटनेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
डायघर येथे डम्पिंग ग्राऊंडजवळ मुंबईत विसर्जित करण्यात आलेल्या दीड दिवसांच्या शेकडो गणेशमूर्ती शुक्रवारी टेम्पोतून आणल्या होत्या. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच गणेशमूर्तींची विटंबना होत असल्याने त्या डम्पिंग ग्राऊंडजवळ टाकण्यास विरोध केला.
याबाबत स्थानिकांनी तेथील अधिकाऱ्यांना विचारले असता, समुद्रामध्ये सहा फूटांपेक्षा लहान आकाराच्या मूर्ती समुद्रात विसर्जित करायच्या नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर गणेशमूर्ती येथे आणून ठेवल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संतापलेल्या रहिवाशांनी सर्व वाहने अडवून त्यांना परतवून लावले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ठाकरे गटाकडून संताप
– या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले, ‘स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकारच जर आपल्या आराध्य दैवत गणरायाचा अपमान करत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत.
गणरायाचा अपमान करणाऱ्यांना जागेवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनीही संताप व्यक्त करून म्हटले की, महाराष्ट्राच्या घराघरात पूजले जाणारे गणपती आराध्य दैवत आहेत. विसर्जनानंतर मूर्तींचा अवमान हा धार्मिक भावनांचा अपमान आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. या असंवेदनशील शासनाचा विसर्जनाचा दिवस लांब नाही अशी टीका त्यांनी केली.