कल्याण – कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली भागातील सारस्वत बँकेच्या रक्कम भरणा एटीएममध्ये अज्ञात इसमाने ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा बुधवारी भरणा केल्या आहेत. बँकेच्या पडताळणीत या नोटा बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सारस्वत बँकेच्या काटेमानिवली शाखेतील नियंत्रक अधिकारी मृदुला नेहेरकर यांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सारस्वत बँकेचे कल्याण पूर्वमधील काटेमानिवली विभागात रक्कम भरणा आणि रक्कम काढण्यासाठी एटीएम यंत्र आहेत. ग्राहक या यंत्रातून सोयीप्रमाणे रक्कम काढतात. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान एक अज्ञात इसम एटीएम केंद्रात आला. त्याने ५०० रुपयांच्या सोळा बनावट नोटा एटीएम केंद्रात भरणा करून तेवढ्याच नोटा दुसऱ्या एटीएममधून काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – ठाणे, मुंबई जिल्ह्यात १०० गुन्हे केलेला ‘मोक्का’तील फरार इराणी गुंड अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एटीएममधील जमा आणि काढलेल्या नोटांचा ताळेबंद करत असताना बँक अधिकाऱ्यांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा अज्ञात इसमाने एटीएममध्ये भरणा केल्या आहेत हे निदर्शनास आले. या प्रकाराने बँकेत खळबळ उडाली. बँक अधिकारी मृदुला नेहेरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर पगारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.