डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानकाजवळील बापूसाहेब फडके रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एक मोटार बेवारस स्थितीत उभी आहे. या वाहनामुळे या रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. या मोटारीमुळे परिसरातील दुकानदार वाहने आणि येजा करण्यास त्रास होत असल्याने त्रस्त आहेत. यासंदर्भातच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी या मोटीराला एक नोटीस लावून संबंधित वाहन मालकाला ४८ तासाच्या आत मोटार घेऊन जाण्याचे कळविले आहे.
४८ तासाच्या आत ही मोटार संंबंधित वाहन मालकाने बापूसाहेब फडके रस्त्यावरून हटविली नाही तर ही मोटार कल्याण डोंबिवली पालिकेच्या साहाय्याने कारवाई करून जप्ती वाहनतळावर घेऊन जाण्यात येईल, असा इशारा या नोटिसीत वाहतूक विभागाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिला आहे. बापूसाहेब फडके या ३० फूट रूंदीच्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही मार्गिकेत एका वेळी वाहने आली की हा रस्ता वाहनांनी जाम होतो. अशा या वर्दळीच्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचे नियम दुर्लक्षित करून हाॅटेल माॅर्डन कॅफे समोरील रस्त्यावर पदपथाला खेटून पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाचा वाहन नोंदणी क्रमांक असलेली एक मोटार उभी करण्यात आली आहे.
या मोटारीमुळे या मोटारीच्या भागात व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना आपली दुचाकी वाहने उभी करण्यात येत अडथळे येत आहेत. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना अडथळा निर्माण होत आहे. या वाहनावर धुळीचे थर साचले आहेत. अन्य भागात गुन्हा करून हे वाहन फडके रस्त्यावर बेवारस स्थितीत सोडून देण्यात आले का, अशी चर्चा या भागातील रहिवासी, व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे.
या बेवारस स्थितीत उभ्या केलेल्या मोटारीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या भागातील काही जागरूक नागरिक, व्यापाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी या मोटारीची पाहणी केली. आणि या वाहनाच्या मालकाला ४८ तासाच्या आत संबंधित वाहन घेऊन जाण्याची नोटीस या वाहनावर लावण्यात आली आहे.
हे वाहन संबंधित मोटार वाहन मालकाने ४८ तासाच्या नेले नाहीतर वाहतूक विभागाच्या सूचनेवरून कल्याण डोंबिवली पालिका हे वाहन टोईंग व्हॅनच्या साहाय्याने जप्ती वाहनतळावर घेऊन जाईल, असा इशारा या नोटिसीतून वाहन मालकाला देण्यात आला आहे.
बापूसाहेब फडके रस्त्यावर बेवारस स्थिती उभ्या केलेल्या वाहनाची पाहणी करण्यात आली आहे. परिसरातील कोणाचेही हे वाहन नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे या वाहनाच्या मालकाला मोटारीवर नोटीस चिटकवून वाहन २४ तासाच्या आत घेऊन जाण्याची तंबी देण्यात येईल आणि त्यानंतर हे वाहन मालकाने नेले नाहीतर ते हायड्रा वाहनाने पालिकेच्या जप्ती वाहनतळावर जमा करण्यात येणार आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.
