टीएमटीच्या सेवेचीही ‘रखड’पट्टी

खड्डे, वाहतूक कोंडीमुळे बस गाडय़ा विलंबाने

ठाणे : ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच वाहतूक कोंडीचा फटका ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ‘टीएमटी’ बस सेवेलाही बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे विविध मार्गावरील टीएमटीच्या बस गाडय़ांना विलंब होऊ लागल्याने फेऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे प्रवाशांनाही बस थांब्यांवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकीकडे बस प्रवासात वाया जाणारा वेळ आणि दुसरीकडे बसच्या प्रतीक्षेत खर्ची पडणारा वेळ अशा दुहेरी कोंडीत ठाणेकर बस प्रवासी अडकले आहेत.

घोडबंदर, तीन हात नाका, नितीन कंपनी अशा शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे मागील काही दिवसांपासून शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीत टीएमटी गाडय़ाही अडकत असून याचा फटका प्रवाशांना बसत आहे. ठाणे शहरात सद्य:स्थितीला दररोज २३० ते २४० बस गाडय़ा विविध मार्गावर धावत आहेत. लोकमान्यनगर ते मुलुंड स्थानक, लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक, लोकमान्यनगर ते वृंदावन सोसायटी, पवारनगर ते ठाणे स्थानक तसेच घोडबंदर, भिवंडी अशा विविध मार्गावर स्थानक परिसरातील सॅटिस पुलावरून या बस सोडल्या जात आहेत. लोकमान्यनगर, वागळे या ठिकाणी जाणाऱ्या प्रवासी वर्गाची संख्या मोठी असल्याने मुलुंड तसेच स्थानक परिसरातील बस थांब्यांवर प्रवाशांची मोठी रांग लागलेली असते. मागील काही दिवसांपासून शहरातील खड्डय़ांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीत बराच वेळ बस अडकत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस थांब्यांवर अर्धा ते पाऊण तास बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. मुलुंड-लोकमान्यनगर, वागळे इस्टेट-वृंदावन, लोकमान्यनगर ते वृंदावन आणि मुलुंड-नारपोली या मार्गावर दररोज ३५ ते ३६ गाडय़ा धावत असतात. खड्डय़ांमुळे १५ गाडय़ांचे नुकसान झाले असून या गाडय़ा नादुरुस्त अवस्थेत आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून केवळ २० ते २२ गाडय़ा या मार्गावर धावत असून या मार्गावरील फेऱ्यांमध्येही घट झाली असल्याची माहिती ठाणे परिवहन विभाग सभापती विलास जोशी यांनी दिली. अपुऱ्या गाडय़ांची संख्या तसेच वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा अधिकचा वेळ खर्च होत असल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.

निम्म्या बस फेऱ्या रद्द

मुलुंड ते लोकमान्यनगर मार्गावर दररोज सात गाडय़ा धावतात. मात्र, सध्या तीनच गाडय़ा धावत आहेत. वागळे ते वृंदावन मार्गावर पंधरापैकी केवळ आठ, लोकमान्यनगर ते वृंदावन आणि वागळे ते आनंदनगर मार्गावर दहापैकी सात, तर मुलुंड ते नारपोली मार्गावर पाचपैकी दोनच गाडय़ा धावत आहेत. गाडय़ांची संख्या घटल्यामुळे या मार्गावरील फेऱ्यांमध्येही घट झाली असून याचा त्रास प्रवाशांना होत आहे.

खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये घट झाली आहे. ज्या ठिकाणी चार फेऱ्या होत असायच्या तेथे केवळ दोनच फेऱ्या होत आहेत. लवकरात लवकर पुन्हा या फेऱ्या वाढविण्यात येतील.

शशिकांत धात्रक, परिवहन उपव्यवस्थापक, ठाणे महापालिका

सॅटीस पुलावरील बसथांब्यांवर दररोज सकाळी प्रवाशांच्या भल्यामोठा रांगा लागतात.