कल्याण – महिलेचा विनयभंग करणे, त्यांच्या बरोबर अश्लील हावभाव करणे, बालिकेवर लैंगिक अत्याचार करणे अशा स्वतंत्र तीन गुन्ह्यांचा कल्याण, डोंबिवलीतील मानपाडा, कोळसेवाडी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, तत्परतेने तपास करून आरोपींविरुध्द ४८ तासात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
कल्याण पोलीस परिमंडळातील अशाप्रकारे महिलांवरील अन्यायविषयक गुन्हा घडवून त्याचा तपास करून ४८ तासात दोषारोप पत्र दाखल होण्याची मागील अनेक वर्षातील ही पहिलीच घटना आहे. महिला, बालिकांच्या बाबतीत विनयभंग, लैंगिक अत्याचार, त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणे असे प्रकार आरोपींकडून घडल्यानंतर संबंधित पीडित महिला, तिचे कुटुंब तणावाखाली जाते. या पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा. या प्रकरणातील आरोपींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, या उद्देशातून मानपाडा, कोळसेवाडी, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील या तिन्ही गुन्हे प्रकरणांचा जलदगतीने स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात आला. तातडीने याप्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.
विनयभंग, अश्लील हावभाव आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्याने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल आंधळे, मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुध्दे, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलावडे यांनी गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक आणि याविषयीचा तपास केला. साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. तपासानंतर तात्काळ तिन्ही आरोपींविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
महिलांची छेडछाड, विनयभंग, बालिकेचा विनयभंंग, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. ही प्रकरणे लवकर न्यायालयात सुनावणीसाठी यावीत. या उद्देशातून तत्परतेने या गुन्ह्यांचा तपास करून न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. – अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, कल्याण.