• वरिष्ठ काम करू देत नसल्याचा साहाय्यक पोलीस निरीक्षकाचा आरोप
  • वसईत वेश्या व्यवसाय, ड्रग्ज व्यवहारांत वाढ; मात्र कारवाई नाही

मुंबईतील एका वाहतूक पोलिसाने पोलीस दलातील निष्क्रियता आणि खाबूगिरीचे प्रकरण थेट समोर आणल्याचे प्रकरण ताजे असतानाच वसईतील एका पोलिसानेही पोलीस दलातील निष्क्रियतेविरोधात एल्गार पुकारला आहे. वसई-विरारमध्ये वेश्या व्यवसाय आणि अमली पदार्थाचा व्यवहार याविरोधात वरिष्ठांना वारंवार माहिती देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही, असे ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखे’तील या पोलीस उपनिरीक्षकाचे मत आहे. त्याने याविरोधात अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले असून पोलीस दलातील उदासीनतेविरोधात कोरडे ओढले आहे. या अनैतिक धंद्यांविरोधात मलाही कारवाई करू देत नाही आणि वरिष्ठ पोलीस स्वत:ही कारवाई करत नाही, असा आरोप त्याने केला आहे.

वसईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी हे पत्र वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी वसई-विरार शहरात सुरू असलेला वेश्या व्यवसाय तसेच अमली पदार्थाच्या व्यवहारांची माहिती दिली आहे. शहरात अमली पदार्थाचे जाळे पसरले असून शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात गुरफटल्याचे या पत्रात म्हटले आहे. एक पोलीस कुटुंबही अमली पदार्थाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त झाल्याचे पत्रात म्हटले आहे.

याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलीस कर्मचाऱ्याने जर असे आरोप केले असतील, तर नक्कीच त्याची शहानिशा करून दखल घेतली जाईल, असे ते म्हणाले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेचे प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अमली पदार्थाची कुठलीच माहिती गोसावी यांनी दिली नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ दूरध्वनीवर सांगून किंवा जुजबी माहिती देऊन वेश्या व्यवसायावर कारवाई करता येत नाही. त्यासाठी अशासकीय संस्थेची मदत लागते, असे त्यांनी सांगितले.

महेश गोसावी यांचे आरोप

मी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेत आल्यापासून ेखबऱ्यांचे जाळे तयार केले आणि अनैतिक व्यवसायाची माहिती गोळा कली. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मला काम करू देत नाहीत, तसेच शाखेचे प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील काहीच काम करत नाहीत. त्यामुळे कार्यालयात रिकामे बसावे लागते.

माझा कुठलाही वैयक्तिक वाद नसून सामाजिक बांधिलकी म्हणून हे पत्र पाठवत आहे. या पत्रामुळे दुखावलेले भ्रष्ट अधिकारी माझी प्रतिमा मलिन करतील, अशी भीती आहे. मात्र माझ्याकडे सर्व अनैतिक धंद्यांचे पुरावे आहेत.

अमली पदार्थाचे जाळे वसईत खोलवर रुजले आहे. शाळकरी मुलांना अमली पदार्थ दिले जात आहेत. वेश्या व्यवसायात चांगल्या घरातील अनेक अल्पवयीन मुलींना ओढले जात आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखेकडे अधिकार आहेत. मी या शाखेत कार्यरत असूनही काहीच काम करू दिले जात नाही.

हे पत्र अद्याप पाहिलेले नाही; परंतु पत्राची शहानिशा केली जाईल. गोसावी यांच्याशी प्रत्यक्ष बोलून सविस्तर माहिती घेतली जाईल.

योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. अमली पदार्थाबाबत कुठलीच माहिती गोसावी यांनी दिलेली नव्हती.

मारुती पाटील, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधात्मक शाखा