डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील वीर सावरकर रस्ता आणि नेहरू रस्ता यांच्या केंद्र स्थानी असलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्यावरील भूमिगत गटारावरील झाकण तुटले आहे. वाहने या भागातून जात असताना मोटारी या तुटलेल्या झाकणामुळे आपटत आहेत. काही वेळेस दुचाकीचे चाक तुटलेल्या झाकणाच्या भागात अडकून दुचाकीसह दुचाकीस्वार जमिनीवर पडत आहेत.

मागील काही दिवसांपासून हे तुटलेले झाकण दुरूस्त केले जात नसल्याने परिसरातील रहिवासी, विक्रेते, व्यापारी, प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. वीर सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावरील अंतर्गत गल्ल्यांमधील रस्ते सीमेंट काँक्रीटचे करण्यात आले आहेत. काँक्रीटचे काम करत असताना वीर सावरकर रस्ता भागातून येणारा रस्ता नेहरू रस्त्याला ज्या केंद्र बिंदूवर मिळतो त्या ठिकाणी भुटारी गटारावरील झाकण तुटले आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील हा रस्ता आहे. या रस्त्याला जोडून बापूसाहेब फडके रस्ता आहे. या रस्त्यावर दिवस, रात्र वाहतूक सुरू असते. नेहरू रस्ता व्यापारी पेठेचा रस्ता आहे. या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील तुटलेल्या झाकणाच्या तक्रारी काही नागरिकांनी पालिकेत केल्या आहेत. या तक्रारीचे लवकर निराकरण करावे म्हणून पालिकेत गेलो की तेथे आम्हाला यासंदर्भात ९० फुटी रस्ता भागातील कार्यालयात अभियंत्यांना भेटण्यासाठी जाण्यास सांगितले जाते, असेही काही नागरिकांनी सांगितले.

रात्रीच्या वेळेत झाकण तुटलेल्या भागातून वेगाने दुचाकी स्वार गेला तर दुचाकी स्वार या तुटलेल्या झाकण भागात अडकून भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. दिवसा या तुटलेल्या झाकणाचा भाग निदर्शनास येतो. रात्रीच्या वेळेत झाकण मोटार, दुचाकी चालकाच्या लक्षात आले नाहीतर चालक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती परिसरातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

याठिकाणी होणारे अपघात बघून परिसरातील जागरूक नागरिकांनी तुटलेल्या झाकणाच्या वरती मोडकळीस आलेला वेताचा पाळणा ठेऊन त्यावर इशारा देण्यासाठी फडकी टाकून ठेवली आहेत. जेणेकरून वाहन चालकाला हा तुटलेला पाळणा आणि फडकी पाहून याठिकाणी काही तरी तुटलेले आहे हे दिसावे हा उद्देश आहे.

पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची या भागातून नियमित वर्दळ असते त्यांनाही हे तुटलेले झाकण दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत. कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात अशाप्रकारे झाकणांवरील गटारे तुटली आहेत. काही ठिकाणी दुरूस्तीचे कामे केली जात आहेत तर काही ठिकाणी नागरिकांनी तुटलेल्या भागात झाडाची फांदी, काठी उभी करून प्रवाशांना इशारा देणाऱ्या खुणा उभ्या केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.